साईमत मुंबई प्रतिनिधी
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजप आणि जेडीएस पक्षाला धूळ चारत काँग्रेसने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. विधानसभेच्या २२४ जागांपैकी तब्बल १३५ पेक्षा अधिक जागांवर आघाडी घेत काँग्रेसने कर्नाटकाची सत्ता स्वबळावर काबीज केली आहे. सर्व जागांवरील अंतिम निकाल येणे अद्याप बाकी आहे. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
कर्नाटकाचा विचार केल्यास तिथे कोणतेच सरकार दुसऱ्यांदा सत्तेत येत नाही. एखादा दुसरा अपवाद सोडला, तर ते बदलत असते. यावेळी आम्ही तो ट्रेंड तोडू शकू असे वाटत होते. पण, ते आम्ही तो ट्रेंड तोडू शकलो नाही. २०१८साली भाजपच्या १०६ जागा निवडून येत ३६ टक्के मत मिळाले होती. आता भाजपला ३५.६ टक्के मते मिळाली आहेत. म्हणजे यावेळी फक्त ०.४ टक्के मते भाजपची कमी झाली आहेत. तसेच, ४० जागाही कमी झाल्यात, असे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.
२०१८ साली काँग्रेसला ३८ टक्के, तर जेडीएसला १८ टक्के मते मिळाली होती. जेडीएसची ५ टक्के मते कमी झाली. ही मते काँग्रेसला मिळाली आहेत. त्यामुळे काँग्रेसला विजय मिळाला आहे. भाजपची मते कुठेही कमी झालेली नाहीत, असे देवेंद्र फडणवीसांनी म्हटले आहे.
काही लोकांना असं वाटत आहे, जवळपास ते देशच जिंकले आहेत. त्यांना एवढाच सल्ला आहे, की पूर्वीचे विधानसभा आणि नंतर लोकसभेचे निकाल पाहिजे पाहिजेत. आजच उत्तर प्रदेशच्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल समोर आले आहेत. याठिकाणी भाजप एकहाती निवडून आली आहे. त्यामुळे कर्नाटकाचे उदाहरण देऊन देश जिंकल्याचे ते सांगत आहेत, त्यात कोणताही अर्थ नाही. संजय राऊतांच्या बाबतीत सांगायचे झाले तर बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना, अशी त्यांची स्थिती आहे. दुसऱ्याच्या घरात बाळ जन्मला तर पेढे हे वाटतात. एखादी पोटनिवडणूक, महापालिकेची एखादी निवडणूक जिंकले तर हे मोदींचा पराभव झाल्याचे नेहमीच सांगतात. त्यांना देशात परिवर्तनाचे स्वप्न पडू लागतात. मात्र मला विश्वास आहे, कर्नाटकातील निवडणुकीचा कोणताही परिणाम देश आणि महाराष्ट्रातही होणार नाही. देशात मोदींचे आणि महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेचं सरकार येणार, असा दावा देवेंद्र फडणवीसांनी केला.