स्मृतींना आवडीच्या संगीत मैफिलीद्वारे दिला उजाळा
साईमत/जळगाव/न.प्र.:
‘नाम गुम जाएगा,चेहरा ये बदल जायेगा, मेरी आवाज ही पहचान है…’ अशी सार्थ साद देत स्व. आर. बी. (नाना) पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आर. डी. बर्मन – नाना संगीत मैफिलचे मित्र परिवारातर्फे नेचर कॅफे, कन्या शाळेसमोर येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आर. बी. नाना नावाने सर्वाना परिचित असणारे नाना एस. टी. महामंडळातून अकाऊंटट पदावर सेवानिवृत्त झाल्यानंतर ते मराठा मंगल या विवाह संस्थेच्या माध्यमातून सेवाभाव जपणारे, आणि यशदा पुणे यांचे माहिती (RTI) प्रचार आणि प्रसार व माहिती अधिकार क्लिनिक मोफत चालवून सामाजिक जीवनात सक्रियपणे हिरीरीने कार्यरत होते.
तसेच नाना हे संगित क्षेत्राची प्रचंड आवड जपणारे होते. आर. बी. नानांना बहीण नसल्याने गान कोकिळा लता मंगेशकर यांनाच त्यांनी बहीण मानले होते. असे हे आर. बी. नाना हे २२ सप्टेंबर २०२३ ला स्वर्गवासी झाले. त्यांच्या संगीतप्रेमामुळे त्यांच्या आर. बी. (नाना) मित्र परिवाराने त्यांच्या स्मृतींना आवडीच्या संगीत मैफिलीद्वारे उजाळा दिला.
यावेळी डॉ. राजेश पाटील (बालरोग तज्ज्ञ, विश्वप्रभा हॉस्पिटल), संघपाल तायडे, उज्ज्वला वर्मा (रेडक्रॉस), प्रा.नितीन महाजन (मॅथ्स क्लासेस), सचिन सोमवंशी, नानांचे कनिष्ठ चिरंजीव मिलिंद पाटील (केंद्र संचालक, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ), सोनल कपोते, नानांचे जावाई शंतनू पाटील, अशोक सनेर आणि विद्या प्रबोधिनीचे संचालक त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव योगेश पाटील यांनी आर.डी.बर्मन यांची सुमधुर गाणी म्हटली.
यांची लाभली उपस्थिती
यावेळी १२ वर्षीय लक्षिता राजेश पाटील हिने आर.डी. बर्मन यांनी संगितबद्ध केलेल्या तीन गाण्यांचं फ्युजन करुन गिटार वर सुंदर सादरीकरण केलं. तसेच ‘शोले’ चित्रपटातील माऊथ ऑरगनची धुन नानांचा नातू चि.राज योगेश पाटील याने सादर केली. यावेळी आ. राजुमामा भोळे, प्रतिभाताई शिंदे, दीपक सूर्यवंशी, विनोद देशमुख, आबा कापसे, डॉ. संदीप पाटील (माऊली हॉस्पिटल, रावेर), पाचोरा येथील सचिन सोमवंशी आदींची तसेच नानांचा मित्रपरिवार व नातेवाईकांची उपस्थिती होती.