जळगावात मराठी प्रतिष्ठान, गुड ग्राउंड वेल्फेअरने राबविला स्तुत्य उपक्रम
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
येथील मराठी प्रतिष्ठान आणि गुड ग्राउंड वेल्फेअर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित केलेल्या वृक्षारोपणाच्या उपक्रमात केवळ नुसती झाडे लावण्यात आली नाहीत तर पर्यावरण रक्षणाची प्रतिज्ञा घेऊन एक सशक्त आणि भावनिक क्षण अनुभवण्यात आला. ‘जबाबदारीचे भान आणि हरित भविष्यासाठी वचन’ असा स्तुत्य उपक्रम आयोजकांनी राबविल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. कार्यक्रमात तरुण-तरुणी, नागरिक आणि पर्यावरणप्रेमींनी सहभागी झाले होते. हा उपक्रम एक सामाजिक शपथविधीच ठरला. जिथे वृक्षारोपणासोबत पर्यावरण रक्षणाची वैयक्तिक व सार्वजनिक बांधिलकी निर्माण झाल्याचे दिसून आले.
वृक्षसंवर्धन नोंद ठेवण्याची तयार केली योजना
प्रत्येक व्यक्तीने स्वतः झाड लावले आणि त्याच्या संगोपनाची जबाबदारी मराठी प्रतिष्ठानने घेतली आहे. त्यामुळे सर्वांचा संकल्प वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा ठरला. झाड लावणाऱ्यांच्या नावासह वृक्षसंवर्धन नोंद ठेवण्याची योजना ‘गुड ग्राउंड वेल्फेअर’तर्फे तयार केली आहे. कार्यक्रमात गुड ग्राउंड वेल्फेअर संस्थेचे अयान पटेल, प्रणव सोनवणे, आर्यन पाटील, रुचिका डाळवी, अनुश्री सावकारे, संस्कार सावकार, क्रितिका चव्हाण, तेजस वर्मा, प्रणीत शिंपी, दर्शन कोळी, खुशी पावरा, हरी सैनी, हेमंत सैनी, लितेश पवार, दीपेश पाटील, पलक पंड्या, कुमकुम जोशी, शिवानी पुरोहित, हितेश नागला, प्रेम नागला, सिद्धी पांडे यांनी श्रमदान करून वृक्षारोपण केले. गुड ग्राउंड वेल्फेअरच्या सर्व सहकाऱ्यांनी खड्डे करून आंबा, चिंच, सिताफळ, करंज, फाफडा, इंग्रजी चिंच अशा वृक्षांची रोपे लावली.
यांची लाभली उपस्थिती
याप्रसंगी मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, उद्योजक सुबोध कुमार चौधरी, सुमोल चौधरी, सृष्टी चौधरी, डॉ.लीना पाटील, मराठी प्रतिष्ठानचे विश्वस्त डॉ.सविता नंदनवार, निलोफर देशपांडे, उद्योजक जमील शेख, सिंगर ग्रुपचे रफिक पिंजारी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, चेतन पवार, राहुल चव्हाण, खुशाल ठाकूर, जैन इरिगेशनचे श्री.देसाई उपस्थित होते.
अशी घेतली उपस्थित सर्वांनी एकत्र शपथ
“आम्ही जागतिक पर्यावरण दिनी संकल्प करतो की, आम्ही केवळ झाडे लावणार नाही तर त्यांचे संगोपन आणि संवर्धन करणार आहोत. प्रत्येक झाडात जीवन आहे आणि त्या जीवनाचे रक्षण करणे ही आमची जबाबदारी आहे. पर्यावरण, निसर्ग आणि पृथ्वीचे ऋण फेडण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करू. स्वच्छ, हरित आणि निरोगी भविष्यासाठी आम्ही एक झाड लावू आणि ते जगवू”, अशी उपस्थित सर्वांनी एकत्र उभे राहून दोन्ही हात वर करून प्रतिज्ञा घेतली.