घटनेनंतर तातडीने रुग्णालयात उपचार; तपासाला वेग
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील उद्योजक संजय रामगोपाल तापडिया यांच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या जवळच १७ डिसेंबर रोजी रात्री जीवघेणा हल्ला झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. आपल्या कंपनीतून घरी परतत असताना एका अज्ञात रिक्षा चालकाने त्यांची कार अडवून रिक्षात बसलेल्या चार ते पाच जणांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच डोक्याच्या मागील बाजूस टणक वस्तूने वार केला. याप्रकरणी १८ डिसेंबर रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एफआयआर क्र. ९१० दाखल केला आहे. ही तक्रार दुपारी १ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. फिर्यादीनुसार भारतीय न्याय संहिता कलम ११८ (१), १२६ (२), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
एफआयआरनुसार, संजय तापडिया हे बुधवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास त्यांच्या ह्युंदाई कार (क्र. एमएच १९ ईपी १८१०) मधून घरी जात असताना एमआयडीसी परिसरात एक अज्ञात रिक्षा त्यांचा पाठलाग करीत होती. त्यांचे घर कॉशीनाथ हॉटेलच्या मागील बाजूस असल्याने त्या रस्त्यावर जात असताना रिक्षाने त्यांची कार अडवली. त्यानंतर रिक्षातून उतरलेल्या अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला चढवून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. घटनेनंतर संजय तापडिया यांचे पुत्र माधव तापडिया तसेच सहकारी भैरव अग्रवाल यांनी त्यांना तातडीने अयोध्या नगर येथील डॉ. किशोर बडगुजर यांच्याकडे उपचारासाठी दाखल केले, असे तक्रारीत नमूद केले आहे.
याप्रकरणी तक्रार दाखल करताना उद्योजक व जिंदा संघटनेचे अध्यक्ष रवि लढ्ढा, भाजप उद्योग आघाडीचे प्रमुख अरुण बोरोले, लघु उद्योग भारतीचे विभागीय प्रमुख समीर साने, रोटेरियन लक्ष्मीकांत मणियार, उद्योजक महेंद्र रायसोनी, अंजनी मुंदडा, रवि फालक, दिनेश राठी, किशोर ढाके, राजीव बियाणी, जिंदा संघटनेचे माजी अध्यक्ष ओमप्रकाश सिंग, ओमप्रकाश अग्रवाल, गितेश मुंदडा यांच्यासह मोठ्या संख्येने उद्योजक उपस्थित होते.
सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
दरम्यान, भ्याड हल्ल्याचा निषेध करत राज्याचे मंत्री ना. गिरीश महाजन, आ.सुरेश भोळे, माजी महापौर नितीन लढ्ढा, भाजपचे अरविंद देशमुख यांनी संजय तापडिया यांच्या तब्येतीची चौकशी केली. संघ परिवाराशी संबंधित उद्योजकावर झालेल्या हल्ल्यामुळे शहरातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या या घटनेने उद्योजकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तपास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी बबन आव्हाड, शहराचे डीवायएसपी नितीन गणपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल रामदास कुंभार करीत आहे.
