नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारताचा गोल्डन बॉय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भालाफेकपटू नीरज चोप्राने वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पिअनशिपमध्ये जबरदस्त खेळी केली आहे. नीरज चोप्राने मेन्स जॅव्हलिन थ्रो स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. नीरजने आपल्या पहिल्या प्रयत्नात ८८.७७ मीटर लांब भाला फेकत अंतिम सामन्यात आपली जागा नक्की केली आहे. २७ ऑगस्टला अंतिम सामना खेळला जाणार आहे.
नीरज चोप्रा ग्रुप-ए मधून खेळत होता. या गटात अँडरसन पीटर्स आणि ज्युलिअन पीटर्सही होते. ग्रुप-बी मध्ये पाकिस्तानचा अर्शद नदीम आणि जॅकब वाडलेच यांच्यासारखे स्टार खेळाडू होते. जॅव्हलिन थ्रो स्पर्धेच्या अंतिम फेरीत पात्र होण्यासाठी ८३ मीटर दूर भाला फेकण्याची अट आहे. नीरज चोप्राने अत्यंत सहजपणे हे अंतर पार केले.
पॅरिस ऑलिम्पिकसाठीही पात्र
श सध्याचा हंगामातील हे नीरज चोप्राची ही सर्वात चांगली कामगिरी आहे. याआधी त्याची सर्वात्तम कामगिरी ८८.६७ मीटर होती. या चॅम्पिअनशिपमध्ये नीरज चोप्रासह जगभरातील ३७ खेळाडू सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, नीरज चोप्रा यासह पॅरिस ऑलिम्पिक २०२४ साठीही पात्र ठरला आहे. पॅरिस ऑलिम्पिक २६ जुलै ते ११ ऑगस्टपर्यंत खेळले जाणार आहे.