Encroachment : सार्वजनिक रस्त्यावर टिनशेडचे अतिक्रमण

0
10

रहिवाशांची प्रशासनाकडे धाव

साईमत/  मलकापूर/प्रतिनिधी :

मलकापूर ग्रामीण येथील गजानन नगरी (सर्व्हे क्र.१९५/१) परिसरात सार्वजनिक रस्त्यावर उभारलेल्या टिनशेडच्या अतिक्रमणाविरोधात स्थानिक रहिवाशांनी प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे. प्लॉट क्र.१४-ब व ७-ए येथील रहिवासी किर्ती अनिरुद्ध जाधव आणि प्रिती मदन रेळे यांनी ही तक्रार नोंदवली.

तक्रारीनुसार काही अज्ञात व्यक्तींनी सार्वजनिक रस्त्यात एमएसईबीच्या डीपीचे साहित्य वापरून अनधिकृत टिनशेड उभारले असून त्याठिकाणी विशिष्ट धर्माचे फोटो ठेवून पूजा-अर्चा व मोठ्या आवाजात वाद्य वाजविण्याचे कार्यक्रम सुरू आहेत. यासाठी मुख्य विद्युत लाईनवरून बेकायदेशीररीत्या कनेक्शन घेतल्याचा आरोपही करण्यात आला आहे.या प्रकारामुळे परिसरात ध्वनीप्रदूषण वाढून मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार आहे. तसेच

अतिक्रमणकर्त्यांना विरोध केल्यास वाळीत टाकण्याच्या आणि त्रास देण्याच्या धमक्या दिल्याचा दावा करण्यात आला आहे. यापूर्वी ग्रामपंचायत मलकापूर ग्रामीणने अतिक्रमण हटविण्याची सूचना दिली असली तरी कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. संबंधितांनी हे बांधकाम कायमस्वरूपी करण्याचा प्रयत्न करू शकतात, अशीही भीती व्यक्त करण्यात आली.

सार्वजनिक रस्त्यातील हे अतिक्रमण तातडीने हटवून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी त्वरित कारवाई करावी, अशी मागणी किर्ती जाधव व प्रिती रेळे यांनी केली आहे. ही तक्रार उपविभागीय अधिकारी, मलकापूर शहर पोलिस निरीक्षक, गटविकास अधिकारी व महावितरणचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here