रक्ताची नाती नाहीत, पण मनाची नाती जुळली
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
दिवाळी म्हणजे नात्यांचा, प्रेमाचा आणि आनंदाचा सण. मात्र समाजात असेही काही लोक आहेत, ज्यांना कुणाचा आधार नाही, ज्यांच्याकडे कुटुंब नाही. अशा बेघर, आशाळभूत भावांसोबत नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेतर्फे भाऊबीज साजरी करण्यात आली. अशा उपक्रमातून प्रेम, जिव्हाळा आणि माणुसकीचा संदेश देत ‘नारीशक्ती’च्या बहिणींनी सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण घालून दिले.
‘नारीशक्ती’ संस्थेच्या कार्यकर्त्या बहिणींनी शहरातील नवीन बसस्थानकालगतच्या बेघर निवारा केंद्रातील परिवारा आपले मानत हा सण साजरा केला. यावेळी त्यांनी भावांना ओवाळून भेटवस्तू दिल्या आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवले. ज्यांना रक्ताची नाती नाहीत, त्यांना मनाचा आधार देण्याचे काम ‘नारीशक्ती संस्थे’च्या बहिणींनी केले. भाऊबीजेच्या ओवाळणीसोबत त्यांनी प्रेमाचा संकल्प, विश्वासाची ग्वाही आणि संरक्षणाची वचनबद्धता पुन्हा दृढ केली.
दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘नारीशक्ती’ संस्थेने बेघर निवारा केंद्रात भाऊबीज साजरी करण्याची परंपरा कायम ठेवली. रक्षाबंधन आणि भाऊबीज हे दोन्ही सण संस्थेच्यावतीने परिवारासोबत साजरे केले जातात, ही बाब समाजात कौतुकास्पद ठरत आहे. कार्यक्रमाला संस्थेच्या अध्यक्षा मनीषा पाटील, पत्रकार चंद्रशेखर नेवे, आशा मौर्य, नेहा जगताप, हर्षा गुजराती, किशोर पाटील, सेजल वनरा आणि शितल काटे आदी उपस्थित होते. बेघर निवारा केंद्राचे व्यवस्थापक मनोज कुलकर्णी यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले.
भावनिक क्षणांची झलक
भाऊबीजेच्या या अनोख्या सोहळ्यात बेघर बंधूंच्या चेहऱ्यावर उमटलेले आनंदाचे हास्य आणि बहिणींच्या डोळ्यातील समाधानाचे अश्रू, हेच या उपक्रमाचे खरे यश ठरले. ‘नाती रक्ताची नसली तरी मनाची असू शकतात’, हा सुंदर संदेश या उपक्रमातून अधोरेखित झाला.



