साईमत, पारोळा : प्रतिनिधी
येथील राष्ट्रीय महामार्ग ५३ वर सबगव्हाण गावाजवळ सुरू होणाऱ्या टोल आकारणीच्या विरोधात स्थानिक नागरिकांनी एकजूट दाखवत एल्गार पुकारला आहे. यावेळी प्रशासनास निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे. यासंदर्भात विद्यमान आमदार, खासदार यांचा कोणताही प्रतिनिधी उपस्थित नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. मागणीचे निवेदन तहसीलदार उल्हास देवरे, पोलीस निरीक्षक सुनील पवार यांना देण्यात आले. यावेळी व्यापारी महासंघ, शरद पवार गट यांच्याकडूनही निवेदन देण्यात आले.
याबाबत डॉ.योगेंद्र पवार यांनी सांगितले की, सोमवारी, ११ मार्चपासून सकाळी आठ वाजेपासून टोल आकारणी सुरू होणार आहे. त्यात ट्रक, बस यांना ३६५ रुपये मोजावे लागतील तर हलके वाणिज्य वाहने, मालवाहू वाहने यांना १७५ ते २६० रुपये असणार आहे. कार, प्रवासी वाहने यांना ११० ते १६० रुपये तीन अक्साल वाहने ४०० ते ६००, बांधकामासाठी नेणाऱ्या वाहनांना ५७५ ते ८०० तर मोठी वाहनांना ७०० ते १०५० रूपये मोजावे लागणार आहे. त्यात वीस कि.मी. अंतरावरील वाहनांना मासिक पास ३३० रूपये दिली जाणार आहे. त्यात रोज ये-जा करणाऱ्या व नियमित न जाणाऱ्या वाहनांना एकच नियम लावले जात आहे. याबाबत नागरिकांमध्ये उद्रेक तयार झाला आहे.
याबाबत टोल प्राधिकरण अधिकारी वर्गाने समितीचे म्हणणे ऐकून याबाबत स्थानिक वाहन धारकांसाठी नवी नियमावली करावी. महामार्ग हा अपूर्ण अवस्थेत आहे. अपूर्ण काम असतांना त्याचे शासकीय उद्घाटन करणे अजून राहिले आहे. या महामार्गावर ‘नही’कडून हायमास्ट लॅम्प, दिशादर्शक फलक, कॅटल गार्ड, फूटपाथ, गटारी, स्वच्छता गृह, ॲम्ब्युलन्स, अपघात होऊ नये, यासाठी आवश्यक हायमास्ट लॅम्प, गतीरोधक, झेब्रा क्रॉसिंग, पारोळा शहरातून जाणाऱ्या जुन्या महामार्गावर रस्ते दुभाजक, जुना महामार्ग दुरुस्ती अशा प्रकारचे अनेक कामे अजून करावयाचे बाकी आहे. त्यामुळे सर्व कामे पूर्ण झाल्यावर २० किलोमीटर अंतर्गत सर्व स्थानिक लाभार्थ्यांना खासगी वाहनांसाठी २० रुपये प्रति फेरीप्रमाणे टोल आकारणी करावी, अशी मागणी सर्व लोकांनी केली आहे.
यांची होती उपस्थिती
निवेदन देतांना माजी नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील, रोहन पवार, तुषार पाटील, मनोराज पाटील, पतंगराव पाटील, किशोर पाटील, शशिकांत साळुंखे, दीपक अनुष्ठान, डॉ.शांताराम पाटील, महेश पाटील, विजय पाटील, गणेश पाटील, केशव क्षत्रिय, अशोक ललवाणी, प्रा.जे.बी.पाटील, संतोष महाजन, सुवर्णा पाटील, जयश्री साळी, स्वाती शिंदे, किशोर पाटील, सुनील देवरे यांच्यासह सर्वपक्षीय, वकील, डॉक्टर, प्राध्यापक, शिक्षक, व्यापारी, चालक, इतर सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.