वाहतुकीचा चक्का जाम, दीड तास चालले आंदोलन
साईमत/भडगाव/प्रतिनिधी :
धनगर समाजाला आदिवासी जमातीत समाविष्ट करण्यात येऊ नये, यासाठी सोमवारी, ३० रोजी दुपारी १२.३० वाजता भडगाव येथील पारोळा चाळीसगाव चौफुलीवर एकलव्य संघटनेमार्फत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. रास्ता रोको आंदोलन एकलव्य संघटनेचे संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष पवनराजे सोनवणे यांच्या आदेशाने तर संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष रवींद्र शांताराम सोनवणे यांच्या नेतृत्वात करण्यात आले. हे आंदोलन तब्बल दीड तास चालले. रस्त्यावर वाहनांचा चक्का जाम झाल्याने वाहतूक काही वेळ खोळंबल्याचे दिसुन आले. यावेळी संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केल्याने परिसर दणाणला होता. यावेळी एकलव्य संघटनेमार्फत भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांना तसेच तहसिल प्रशासनास निवेदन देण्यात आले.
केवळ मतांच्या राजकारणासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनगर समाजाला आदिवासीमध्ये समाविष्ट करण्यात येणार असल्याचे जी. आर. काढण्याचे सांगत आहेत. महाराष्ट्रातील आदिवासी समाजाच्या भावनेशी खेळणारा असा निर्णय घेतला आहे. हा निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावा, अशा मागणीसंदर्भात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी संघटनेचे जिल्हा युवक अध्यक्ष रवींद्र सोनवणे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी आंदोलनस्थळी संघटनेचे पदाधिकारी, समाज बांधव, महिला, तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या अध्यक्षतेखाली चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.
आंदोलनात यांनी घेतला सहभाग
आंदोलनात एकलव्य संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष जळगाव रवींद्र सोनवणे, जिल्हा संपर्क प्रमुख विजय गायकवाड, भडगाव तालुकाध्यक्ष दशरथ मोरे, शहराध्यक्ष विनोद मोरे, युवा तालुकाध्यक्ष किरण मोरे, सचिव बाळु सोनवणे, तालुका सल्लागार अंकुश मोरे, सदस्य भुरा गायकवाड, अनिल ठाकरे, किरण निकम, गोकुळ निकम, पिंटु वाघ शाखाध्यक्ष वढधे, शिवदास सोनवणे कोळगाव, आत्माराम ठाकरे, हिरामण सोनवणे पथराड, मिथुन गायकवाड वडजी, नाना मालचे आडळसे, रवींद्र मालचे कजगाव, बाळु सोनवणे, नाना पवार कजगाव, इंदल भील वाडे, सुनील मोरे बाळद, परमेश्वर गांगुर्डे, दिनकर सोनवणे, मुरली सोनवणे, रवी मोरे पेठ यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी सहभाग घेतला होता.