‘Babya’ in Rameshwar Colony : रामेश्वर कॉलनीतील ‘बब्या’वर वार प्रकरणी आठ संशयित अटकेत

0
47

जुन्या वादातून घडली होती घटना, पोलिसांनी २४ तासात संशयित पकडले

साईमत/जळगाव/प्रतिनिधी/: 

शहरातील मेहरूण परिसर पुन्हा एकदा ‘गुन्हेगारी टोळक्यांच्या’ दहशतीने हादरला आहे. रामेश्वर कॉलनीतील राज शाळेजवळ जुन्या वादातून हर्षल उर्फ ‘बब्या’ कुणाल पाटील (वय १८, रा. एकनाथ नगर, रामेश्वर कॉलनी) या तरुणावर धारदार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला करण्यात आला. रविवारी १४ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडलेल्या अशा घटनेत ‘बब्या’ गंभीर जखमी झाला होता. दरम्यान, याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी अवघ्या २४ तासात संशयित आठ जणांना अटक केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, जखमीचा मित्र नितीन राजेंद्र देशमुख (वय २१, रा. मंगलपुरी, मेहरूण) याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, रविवारी दुपारी हर्षल पाटीलवर टोळक्याने अचानक धावून जात धारदार शस्त्रांनी प्राणघातक वार केले. वार इतके गंभीर होते की, परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी सोहम गोपाल ठाकरे, दिनेश भरत चौधरी, सनी उर्फ फौजी बाळकृष्ण जाधव, सागर फुलचंद जाधव उर्फ पाव (सर्व रा. रामेश्वर कॉलनी) अशा चौघांविरुद्ध सुरुवातीला गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी कारवाईचा वेग वाढवत ललित उर्फ अभय महेंद्र पाटील (वय २१, रामेश्वर कॉलनी), रोहन शांताराम घुले (वय २०, रा. अशोक किराणाजवळ), राहुल मोतीराम चव्हाण (वय ३०, रा. प्रियंका किराणाजवळ) आणि पावन यादव सोनवणे (वय १९, रा. लक्ष्मी नगर, मेहरूण) अशा आणखी चौघांना अटक केली.

रेकॉर्डवरील गुन्हेगार टोळकी

अटक केलेल्या आरोपींपैकी सोहम ठाकरे वगळता अन्य तिघे रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. विशेष म्हणजे सनी उर्फ फौजी जाधववर यापूर्वी ‘एमपीडीए’अंतर्गत कारवाई केली आहे. त्यामुळे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या टोळक्याचा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होता, असे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे.

पोलिसांची कारवाई

घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here