साईमत, मलकापूर : प्रतिनिधी
गेल्या अनेक दिवसांपासून भुसावळ ते अकोला ही बस भुसावळहून मलकापूरला सकाळी सात वाजे दरम्यान येणारी एसटी बस वडनेर भोलजीला थांबा असतांनाही सर्व्हिस रस्त्याने येऊन प्रवासी न घेता थेट उड्डाणपूलावरुन निघून जात होती. तसेच दिवसभरात अजूनही काही बस उड्डाणपूलावरून निघून जात होत्या. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. त्यामुळे हे नुकसान टाळण्यासाठी शिवसेना उबाठाच्या पदाधिकाऱ्यांनी मलकापुरच्या आगार प्रमुखांची भेट घेऊन थांब्यावर बस थांबविण्याची विनंती केली. तसेच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आगार प्रमुखांना दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्याची दखल घेतल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान तूर्त टळले आहे. त्यामुळे शिक्षणाची सोय झाली असल्याच्या प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या आहेत.
मलकापूरचे बस आगार प्रमुख मुकुंद नाव्हकार यांच्या सोबत त्यांच्या कार्यालयात शुक्रवारी, ९ फेब्रुवारी रोजी शिवसेनेचे (उबाठा) जिल्हाप्रमुख वसंतराव भोजणे, मलकापूरचे शहरप्रमुख गजानन ठोसर, विधानसभा संघटक राजेशसिंह राजपूत, तालुका प्रमुख दीपक चांभारे, शिवसेना उपशहरप्रमुख शकील जमादार, वाहतूक सेनेचे शहरप्रमुख इम्रान लकी, किसान सेनेचे शहरप्रमुख सै.वसीम, डॉ. विनोद घोंग आदींनी त्यांच्याशी चर्चा करून बस थांबविण्यासंदर्भात तातडीने तोडगा काढावा. वडनेर येथे थांबा असलेल्या बसेस थांबत नसल्यास उड्डाणपूलावरच शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
त्यानंतर शनिवारी, १० फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वसंतराव भोजणे आणि मा.सरपंच संतोष दिघे, पवन भालेराव यांच्या हॉटेलजवळ विद्यार्थ्यांसमवेत एक तास अगोदर येऊन थांबले. यावेळी सकाळी आगार प्रमुख मुकुंद नाव्हकार यांना फोन लावून एसटी बस सर्व्हिस रस्त्याने येऊन विद्यार्थ्यांसह प्रवाशांना घेऊन गेली. त्यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टळले असल्याने विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त करुन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.