जिल्हा परिषदेत ‘सकारात्मक शिस्त’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
साईमत/ पहूर, ता. जामनेर/प्रतिनिधी :
तालुक्यातील जोगलखेडे जिल्हा परिषद शाळेत पाचवी शिक्षण परिषद उत्साहात पार पडली. जिल्हास्तरावरून देण्यात आलेल्या डिजिटल मार्गदर्शक सूचनेनुसार परिषदेत ‘सकारात्मक शिस्त’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमात उपस्थित शिक्षक आणि अधिकारी मुलांच्या सर्वांगीन विकासासाठी आवश्यक असलेल्या नैतिक मूल्यांची रुजवणूक, आनंददायी शिक्षण आणि आपत्ती व्यवस्थापनाबाबत सविस्तर सूचना दिल्या.
अध्ययन निष्पत्ती व मासिक नियोजनाबाबत चंदन राजपूत यांनी मार्गदर्शन केले. शिक्षण परिषदेत गुणवत्ता सुधारणा व विचारविनिमयाला महत्त्व दिले गेले. उद्घाटनासाठी पोलीस पाटील विजय पाटील आणि उपसरपंच श्रीकांत चौधरी उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात केंद्रप्रमुख ज्ञानेश्वर पाटील यांनी मार्गदर्शन कसे करावे, शिक्षकांचे कर्तव्य आणि शिस्तीचे महत्त्व यावर भर दिला. जि.प. शाळा जोगलखेडे येथील विद्यार्थ्यांनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले. शोधनिबंध स्पर्धेत निवड झालेल्या रामराव पाटील सर व वैयक्तिक नृत्य स्पर्धेत निवड झालेल्या सचिन पाटील यांचा तसेच मुख्यमंत्री कार्यकौशल्य योजनेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल श्रीमती सोनाली चंद्रकांत पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
शिक्षण परिषदेसाठी भराडी, नाचनखेडे, भिलखेडे, मोरगाव, रोटवद, नांद्रा प्र.लो, सार्वे प्र.लो, जोगलखेडे, चिलगाव, दोंदवाडे, एकुलती या पंचकोशीतील शिक्षक उपस्थित होते. शिक्षणविस्तार अधिकारी पितांबर राठोड व केंद्रप्रमुख ज्ञानेश्वर पाटील यांनी मार्गदर्शन केले. शाळा व्यवस्थापन समितीने कार्यक्रमाच्या यशासाठी अनमोल सहकार्य केले.
परिषदेत उत्कृष्ट नियोजनाबद्दल मुख्याध्यापक संदीप आव्हारकर व त्यांच्या सहकारी भास्कर इंगळे यांचे कौतुक करण्यात आले. सूत्रसंचालन भास्कर इंगळे यांनी केले तर आभार संदीप आव्हारकर यांनी मानले. शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजू नाथजोगी व पालकांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वी झाला.
