नवी दिल्ली : वृत्तसंस्था
दिल्लीतील कथित अबकारी धोरण घोटाळ्यात झालेल्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने ( ईडी ) मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांंना गुरूवारी ( २ नोव्हेंबर ) चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते.आता अरविंद केजरीवाल यांनी ईडीला प्रत्युत्तर दिले आहे. भाजपाच्या सांगण्यावरून नोटीस पाठवण्यात आली होती, असा आरोप केजरीवालांनी केला आहे.
अरविंद केजरीवाल म्हणाले, “ईडीने पाठवलेली नोटीस बेकायदेशीर आणि राजकीय हेतूनं प्रेरित आहे. भाजपाच्या सांगण्यावरून ही नोटीस पाठवली. चार राज्यांच्या निवडणुकीत प्रचार करू नये म्हणून नोटीस पाठवण्यात आली होती. ईडीने तातडीने ही नोटीस मागे घ्यावी.”
दरम्यान, अरविंद केजरीवाल ईडी चौकशीसाठी हजर राहणार नाहीत. मध्य प्रदेशात प्रचारासाठी केजरीवाल जाणार आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि अरविंद केजरीवाल सिंगरौली येथे प्रचार रॅली करणार
आहेत.
मंत्री आनंद यांच्या घरी छापा
दरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिल्लीचे समाजकल्याण मंत्री राजकुमार आनंद यांच्या घरी छापा टाकला असून घराची झडती सुरू आहे.त्याचप्रमाणे राजकुमार आनंद यांच्याशी संबंधित ९ ठिकाणांवरही ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली आहे. छापेमारीचे कारण अद्याप समोर आले नाही.