जि.प.च्या सीईओ मीनल करनवाल यांची माहिती, उमेद अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण महिलांना स्थिर बाजारपेठ
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील महिला बचत गटांनी आत्मनिर्भरतेचा प्रेरणादायी नमुना सादर केला आहे. जिल्हा पातळीवर भरविण्यात आलेल्या दिवाळी मेळाव्यात महिलांनी तब्बल एक कोटी १८ लाख रुपयांची उलाढाल केली असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी दिली. मेळाव्यात जिल्ह्यातील २०० हून अधिक स्टॉल्स उभारण्यात आले होते. महिलांनी स्वतः बनवलेले दिवाळी फराळ, हस्तकला वस्तू, सजावटी साहित्य, फुलांची आरास, गृहोपयोगी साहित्य आणि स्थानिक कृषी उत्पादनांपासून तयार केलेल्या वस्तू विक्रीस ठेवण्यात आल्या. नागरिकांनी अशा उत्पादनांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
जळगाव शहरातील जी.एस. मैदानावरील प्रदर्शन, तसेच नशिराबाद परिसरात भरलेल्या दिवाळी बाजारात महिलांच्या उत्पादनांची मोठ्या प्रमाणावर विक्री झाली. या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना व्यवसायाची नवी दिशा आणि थेट बाजारपेठ मिळाली. हा उपक्रम जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या “उमेद अभियान” अंतर्गत राबविण्यात आला. महिला बचत गटांना स्टॉल उभारणी, प्रशिक्षण, विपणन आणि विक्रीसाठी आर्थिक व तांत्रिक मदत पुरविण्यात आली. त्यामुळे अनेक महिलांना पहिल्यांदाच थेट ग्राहकांशी संवाद साधण्याची आणि स्वतःच्या उत्पादनांची विक्री वाढविण्याची संधी मिळाली.
ग्रामीण भागात आर्थिक स्वावलंबनाची चळवळ मजबूत
उपक्रमाच्या यशासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद सर्वांवर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजीव लोखंडे, उमेद अभियानाचे व्यवस्थापक हरीश भोई तसेच तालुका अधिकारी आणि सहाय्यक गट विकास अधिकारी सरला पाटील, रवींद्र सूर्यवंशी आणि स्वप्निल पाटील यांनी सहकार्य केले. अशा एकत्रित प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील महिला बचत गटांच्या उद्यमशीलतेला नवे बळ मिळाले आहे. ग्रामीण भागात आर्थिक स्वावलंबनाची चळवळ अधिक मजबूत होत आहे.



