डंपरसह चालक ताब्यात, रुग्णालयात नातेवाईकांचा आक्रोश
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
जळगाव ते नशिराबाद रस्त्यावरील राणे हॉस्पिटलजवळ गुरुवारी, १५ मे रोजी दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास एका भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. भरधाव वेगात आणि चुकीच्या दिशेने येणाऱ्या डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने अपघात झाला. अपघाताची मिळताच नातेवाईकांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मन हेलावणारा आक्रोश केला. दरम्यान, पोलिसांनी अपघाताची गंभीर दखल घेतली आहे. अपघात घडविणारा डंपर आणि त्याच्या चालकाला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. अपघातामुळे नशिराबाद गावावर शोककळा पसरली आहे.
सविस्तर असे की, नशिराबाद येथील रहिवासी तेजस युवराज बिऱ्हाडे हा आई-वडील, भाऊ, बहीण यांच्यासह गावात वास्तव्यास होता. तेजसचे वडील मजुरी काम करतात. तेजस (वय २२) हा त्याचा भाऊ तुषार बिऱ्हाडे (वय १९) आणि मित्र अजय सपकाळे (वय २२) यांच्यासोबत १५ मे रोजी दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास दुचाकीवरून नशिराबादहून जळगाव येथे बँड पथकाचे काम करण्यासाठी निघाले होते. त्याचवेळी जळगावकडून नशिराबादकडे जाणाऱ्या एका भरधाव डंपरने अचानक विरुद्ध दिशेने येत त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात तेजसचा जागीच मृत्यू तर त्याचा भाऊ तुषार बिऱ्हाडे आणि मित्र अजय सपकाळे हे दोघे गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात आले.
जखमींना तातडीने उपचारासाठी दाखल केले रुग्णालयात
जळगाव ते नशिराबाद मार्गावरून जाणाऱ्या इतर वाहनचालकांनी तातडीने घटनास्थळी थांबून जखमींना मदत केली. त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. अपघाताची माहिती मिळताच तेजस आणि तुषार यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेऊन एकच आक्रोश केला. त्यामुळे रुग्णालयातील वातावरण अत्यंत शोकाकुल झाले होते.
