साईमत चोपडा प्रतिनिधी
मंगरूळ (ता. चोपडा) येथील शेतकऱ्याने अतिक्रमणाच्या कारणkवरून गेल्या 30 दिवसांपासून उपोषण सुरू कले आहे. शुक्रवारी आंदोलनाचा 30 वा दिवस आहे. आंदोलनाला महिना उलटला तरी अद्याप शेतकऱ्यास न्याय न मिळाल्याने त्यांचे आंदोलन सुरूच आहे. प्रशासकीय पातळीवर आंदोलनाची दखल घेतली मात्र न्याय अजूनही मिळालेला नाही.
प्रकाश श्रीधर पाटील असे आंदोलनकर्त्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्या जागेत काही जणांनी अतिक्रमण केले आहे. यासंदर्भात त्यांनी सातत्याने तक्रारी करूनही दखल न घेतली गेल्याने त्य्ाांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. प्रशासनाने अतिक्रमण काढून त्याचा खर्च बळीराम दामू पाटील यांच्याकडून वसूल करावा आणि त्या रकमेचा भरणा ग्रामपंचायतीत करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान जिल्हा प्रशासनाने या आंदोलनाची दखल घेतली आहे.
चोपडा गटविकास अधिकाऱ्यांनी प्रकाश पाटील यांना आश्वासन दिले असून अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करू, तुम्ही उपोषण मागे घ्यावे,असे आवाहन प्रशासनाने केले आहे. मात्र प्रकाश पाटील हे ठोस कारवाई होत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याच्या भूमिकेवर ठाम आहे. दि. 17 मे रोजी अपर जिल्हा दंडाधिकारी रवींद्र भारदे यांनी जि.प. मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र देऊन उपोषणकर्त्यांना आंदोलनापासून दूर करावे, असे पत्रात म्हटले आहे. परंतु जिल्हा परिषदेने मात्र जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या पत्राची 15 दिवसांपासून दखल न घेतल्याने प्रकाश पाटील महिन्याभरापासून उपोषणास बसले आहेत.