कौटुंबिक आर्थिक वादामुळे भावानेच भावाला धाडले ‘यमसदनी’

0
22

वरणगाव फॅक्टरीतील घटनेप्रकरणी मयताच्या भावाला सुनावली पाच दिवसांची कोठडी

साईमत/वरणगाव/प्रतिनिधी :

वरणगाव फॅक्टरीच्या क्वार्टर थ्री टाईप ४४ मध्ये रहिवास करणाऱ्या लहान भावाची कौटुंबिक प्लॉटच्या आर्थिक वादातून मोठ्या भावाने त्याच्याच निवासस्थानी हत्या करुन भावाला ‘यमसदनी’ धाडले आहे. या घटनेमुळे ‘भाऊच झाला भावाचा वैरी’ अशी परिवाराची स्थिती निर्माण झाली आहे.घटनेतील मोठ्या भावाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला भुसावळ न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

सविस्तर असे की, मयताचे वडील जयसिंग इंगळे हे वरणगाव फॅक्टरीतून सेवानिवृत्त झाले आहे. त्यांची दोन्ही मुले सतीष आणि प्रदीप हे याच फॅक्टरीतील वेगवेगळ्या विभागात उच्चस्थ पदावर कार्यरत आहेत. सतीष जयसिंग इंगळे (वय ५१) हा एएसक्यूएई विभागात उच्चस्थ पदावर अधिकारी असतांना २७ जून रोजी एके ४७ बंदूकीसाठी लागणारी पाच काडतूसे चोरी करून नेत असताना सुरक्षा रक्षकांनी त्याला प्रवेशद्वारावर रंगेहाथ पकडले होते. याबाबत त्यांच्यावर वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होवून त्याची रवानगी जिल्हा कारागृहात केली होती. त्यानंतर त्याची ऑगष्ट महिन्यात जामीनावर सुटका झाल्यानंतर तो मुक्ताईनगर येथील बांधलेल्या निवासस्थानी पत्नी व मुलाबाळांसह राहायला गेला होता. तर त्याचा लहान भाऊ प्रदीप हा फॅक्टरीतच पॅकिंग सेक्शनला सुपरवायझर म्हणून कार्यरत होता. मात्र, प्रदीपचेही घरगुती कौटुंबिक वादातून पत्नीशी जमत नव्हते. त्यामुळे त्यांची पत्नी काही वर्षांपासून आपल्या मुलासह फॅक्टरी परिसरातच विभक्त राहत होती. अशी कौटुंबिक पार्श्वभुमी असलेल्या इंगळे परिवारातील काडतूस चोरी प्रकरणी निलंबित झालेला सतीष इंगळे बुधवारी फॅक्टरीतील स्टेट बँकेत काही कामानिमित्त आला होता. यादरम्यान बँकेसमोरच असलेल्या वसाहतीच्या क्वार्टर क्रमांक ४४ मधील तो प्रदीप याला भेटण्यासाठी गेला होता. दोन्ही भावांमध्ये दुपारी दोन वाजेच्या सुमारास कौटुंबिक प्लॉटच्या आर्थिक कारणावरून वाद निर्माण झाल्यानंतर मोठा भाऊ सतीषने लहान भाऊ प्रदीपचे (वय ४८) डोके भिंतीवर आपटून त्याच्या डोक्यात लाकडी बॅटने जोरदार वार केल्याने प्रदीपचा जागीच मृत्यू झाला. याबाबत दर्यापूरचे पोलीस पाटील गिरीष पाटील यांना माहिती मिळताच त्यांनी वरणगाव पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यानुसार पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भरत चौधरी यांनी सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

आरोपीने केला एकाला अडकविण्याचा बनाव

पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा मयताचा भाऊ तेथेच थांबलेला होता. यावेळी त्याला विचारपूस केल्यावर त्याने माझ्या भावाला एक जण मारून पळाल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी तातडीने तपास चक्रे फिरवून दुसऱ्या संशयिताला ताब्यात घेतल्यावर त्याने संशयित आरोपीनेच मला घटनेनंतर याठिकाणी बोलावून मला या घटनेत गुंतविण्याचा प्रयत्न केल्याने मी घाबरून पळून गेलो होतो. असे पोलिसांना सांगितल्याचे समजते. त्यामुळे संशयित आरोपी चांगलाच मुरब्बी असल्याचे दिसून येत आहे.

फिर्यादीवरून गुन्हा दाखल

याप्रकरणी दर्यापुरचे पोलीस पाटील गिरीष पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. संशयित आरोपीला पोलिसांनी अटक करून भुसावळ न्यायालयात हजर केल्यावर त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढीस तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक भरत चौधरी आणि त्यांचे सहकारी पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here