यावल : प्रतिनिधी
महाराष्ट्र मंदिर महासंघाच्यावतीने महर्षी व्यासनगरी यावल येथे तालुकास्तरीय मंदिर विश्वस्त बैठकीचे येथील श्री महर्षी व्यास मंदिराच्या सभागृहात आयोजन केले होते. बैठकीला तालुक्यातील ३५ हून अधिक मंदिरांचे मंदिर विश्वस्त उपस्थित होते. बैठकीत १४ मंदिरात वस्त्रसंहिता लागू होणार असल्याचा निर्धार मंदिराच्या विश्वस्तांनी घेतला आहे.
‘मंदिरात वस्त्रसंहितेची आवश्यकता’ या विषयावर सनातन संस्थेचे सद्गुरू नंदकुमार जाधव यांनी तर ‘मंदिर संस्कृती रक्षणाची आवश्यकता’ या विषयावर महाराष्ट्र मंदिर महासंघाचे जळगाव जिल्हा समन्वयक प्रशांत जुवेकर यांनी संबोधित केले. वस्त्रसंहिता लागू करण्याच्या विषयानंतर बैठकीला उपस्थित असलेल्या १४ मंदिरांच्या विश्वस्तांनी उत्स्फूर्तपणे त्यांच्या मंदिरात वस्त्रसंहिता लागु करण्याचा निर्णय दिला. महर्षी व्यास मंदिराचे अध्यक्ष प्रमोद गडे आणि त्यांचे सर्व विश्वस्त सहकारी यांच्या साहाय्याने मंदिराच्या सभागृहात शुक्रवारी, १८ ऑगस्ट रोजी यादिवशी यावल तालुकास्तरीय मंदिर विश्वस्त बैठकीचे आयोजन केले होते.
दर महिन्याला बैठक घेण्याचे निश्चित
बैठकीत फैजपूर, हिंगोणा, हंबर्डी, बामणोद, चुंचाळे, दहिगाव, आमोदा आदी तालुक्यातील विविध गावातून मंदिर विश्वस्त उपस्थित होते. बैठकीत प्रत्येक महिन्याला अशी एकदा तालुक्यातील मंदिर विश्वस्तांची बैठक घेण्याचेही निश्चित केले असल्याची माहिती जळगाव जिल्हा महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक प्रशांत जुवेकर यांनी दिली. प्रास्ताविक सातपुडा निवासिनी श्री मनुदेवी मंदिराचे सचिव तथा महाराष्ट्र मंदिर महासंघाचे नीळकंठ चौधरी यांनी केले.