घरासमोरच झाडेझुडपे, डासांची वाढली उत्पत्ती
साईमत/जळगाव/प्रतिनिधी: पिंप्राळा परिसरातील सावखेडा रोड जवळील सोनी नगराजवळ हुडकोकडून येणारा सांडपाण्याचा मोठा नाला आहे. हा नाला परिसरातील रहिवासी भीमराव सोनवणे यांच्या घराजवळून जात असतांना नाल्याच्या बाजूला झाडेझुडपे वाढल्याने कचरा अडकल्याने पाणी थेट नागरिकांच्या घरात शिरते आहे. घरासमोरच झाडेझुडपे, गवत वाढल्याने भीमराव सोनवणे यांच्या घरातच सर्प निघत असल्याने घरातील कुटुंबात भिती निर्माण झाली आहे.
सोनी नगरातील काही नागरिकांनी गटारीचे सांडपाणीसाठी पाईप टाकून भीमराव सोनवणे यांच्या घरासमोरील खुल्या प्लॉटमध्ये सांडपाणी सोडल्याने पाणीचा निचराच होत नसल्याने डबक्यात डासांची उत्पत्ती होते. सांडपाण्यामुळे घरात दुर्गंधी पसरत आहे.
शहरात डेंग्यूची साथ सुरु असुन सोनी नगरात पण डेंग्यू, मलेरियाची साथ होण्याची शक्यता आहे. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने नागरिकांची समस्या त्वरित सोडविण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.