विद्यार्थ्यांनी जीवनात शिस्त, अनुशासनासह संस्काराची जोपासना करा: खा.स्मिताताई वाघ
साईमत/अमळनेर/प्रतिनिधी :
येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे नुकताच सन्मान सोहळा व कृतज्ञता सोहळा पार पडला. त्यात जळगाव लोकसभा मतदारसंघात भरघोस मतांनी निवडून आलेल्या `नवनियुक्त खासदार स्मिताताई वाघ` यांचा तसेच सेवेतून सेवानिवृत्त होत असलेले अमळनेर नगरीचे `डीवायएसपी सुनील नंदवाळकर` यांचा संस्थाध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील, कार्याध्यक्ष युवा नेते अनिकेत पाटील, मार्गदर्शिका शीलाताई पाटील यांच्या सूचनेनुसार नवलभाऊ प्रतिष्ठानचे मानद शिक्षण संचालक प्रा.सुनील गरुड, प्राचार्य विजय बोरसे व प्रभारी कमांडंट सुभेदार मेजर नागराज पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्रा.सुनील गरुड हे होते.
याप्रसंगी आर्मी स्कूलचा ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रमांतर्गत अमळनेर तालुक्यातून प्रथम क्रमांक प्राप्त झाल्याप्रित्यर्थ व आर्मी स्कूलचे काही माजी विद्यार्थ्यांची विविध पदांवर निवड झाल्याप्रित्यर्थ स्मिताताई वाघ, सुनील नंदवाळकर, अमळनेरच्या शिक्षण विस्तार अधिकारी कविता सुर्वे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमापूर्वी सर्व मान्यवरांना आर्मी स्कूलच्या छोट्या जवानांनी पथसंंचालनाद्वारे मानवंदना दिली. पथसंचालनाच्या तयारीसाठी सुभेदार मेजर नागराज पाटील, सुभेदार मेजर श्रीराम पाटील, नायब सुभेदार भटू पाटील यांनी मेहनत घेतली.
कविता सुर्वे यांनी आपल्या मनोगतातून आर्मी स्कूलचा ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रमात प्रथम क्रमांक आल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. खासदार स्मिताताईंनी आर्मी स्कूलच्यावतीने सत्कार स्वीकारत आभार मानले. त्याचबरोबर माझ्या कार्यकाळात आर्मी स्कूलसाठी जी मदत करता येईल ती मी करेल, असे आश्वासित केले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी जीवनात शिस्त आणि अनुशासन सोबतच संस्काराची जोपासना केली पाहिजे, असेही विद्यार्थ्यांना आवाहन केले.
अध्यक्षीय भाषणातून प्रा.सुनील गरुड म्हणाले की, आर्मी स्कूल ही जिल्ह्यातून एकमेव अनुदानित सैनिकी शाळा आहे आणि तिचा नावलौकिक तालुक्यातून नव्हे, जिल्ह्यातून झालेला आहे. त्यामुळे सर्व आर्मी स्कूलच्या टीमचं मी याठिकाणी संस्थेच्यावतीने व नानासाहेबांच्यावतीने अभिनंदन करतो. यावेळी इयत्ता सहावीचे पालक शरद मानकर यांनी शाळेला त्यांचे वडील सैन्य दलात कार्यरत होते. त्यांच्या स्मरणार्थ देणगी दिली. म्हणून त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणपतीची स्थापना केल्याप्रित्यर्थ मंगळ ग्रह सेवा संस्था व व्हाईस ऑफ मीडिया यांच्यातर्फे सन्मानपत्र देऊन आर्मी स्कूलचा गौरव करण्यात आला.
यांची होती उपस्थिती
कार्यक्रमाला केंद्रप्रमुख गवते,नवलभाऊ प्रतिष्ठानचे प्रशासकीय अधिकारी डी.बी.पाटील, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी के.वाय.देवरे, मुख्याध्यापक प्रताप पाटील, पालकवर्ग, आर्मी स्कूलचे सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख उमेश काटे, उपक्रमशील इंग्रजी शिक्षक शरद पाटील तर आभार शरद पाटील यांनी मानले.