Dr. Metta Dhale’s ; डॉ. मेत्ता ढाले यांची वैद्यकीय क्षेत्रात गरुडभरारी

0
7

‘पॅथॉलॉजी’ वैद्यकीय शास्त्रात मास्टर डिग्री मिळवीत सुवर्ण अक्षरांनी कोरले नाव!

साईमत/ यावल -/प्रतिनिधी : 

जळगाव जिल्ह्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या डोंगर कठोरा या गावातील कन्या कुमारी डॉ. मेत्ता मिलींद ढाले यांनी वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत ‘पॅथॉलॉजी’ या वैद्यकीय शास्त्रात मास्टर डिग्री मिळवून आपले नाव सुवर्ण अक्षरांनी कोरले आहे. त्यांच्या या यशामुळे त्यांच्यावर डोंगर कठोरासह संपूर्ण यावल तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

डॉ. मेत्ता या प्रतिष्ठित सिताराम सुका तायडे यांचे नात असून, आयुर्वेदाचार्य पितांबर सिताराम तायडे आणि डॉ. डिगंबर सिताराम तायडे यांच्या नात, तसेच डॉ. अनिता (तायडे) ढाले आणि मिलींद ढाले यांच्या कन्या आहेत. डावणगेरे येथील जेजेएम मेडिकल कॉलेजमध्ये त्यांनी पॅथॉलॉजी या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले असून, नुकत्याच झालेल्या भव्य पदवीदान समारंभात जेजेएम मेडिकल कॉलेजचे पॅथॉलॉजी विभागप्रमुख आणि मणिपाल इन्स्टिट्यूट अँड हॉस्पिटल चेन (बंगळुरू) चे प्रमुख यांच्या हस्ते त्यांनी पदवी स्विकारली.

वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवासात डॉ. मेत्ता यांनी प्रचंड परिश्रम घेतले. विशेष म्हणजे, कोरोना काळात त्यांनी जीवाची पर्वा न करता अहोरात्र रुग्णसेवा करून समाजाप्रती जबाबदारीचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले. डॉ. मेत्ता ढाले या वैद्यकीय शास्त्रात मास्टर डिग्री मिळविणाऱ्या तायडे आणि ढाले परिवारातील पहिल्या मुलगी असून, त्यांच्या या यशाने कुटुंबाचा गौरव वाढविला आहे. त्यांचे संपूर्ण शिक्षण हे आई-वडिलांच्या मार्गदर्शनाखाली आणि कुटुंबाच्या प्रेरणेतून पार पडले.

डॉ. मेत्ता या प्रसिद्ध वैद्यकीय तज्ञ, समाजसेवक आणि गायक डॉ. डिगंबर तायडे यांच्या भाची आहेत. डॉ. तायडे यांना ‘पद्मश्री २०२६’ साठी नामांकन मिळाले असून, त्यांनी ‘आंतरराष्ट्रीय प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्व पुरस्कार २०२५’सह पन्नासहून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सन्मान पटकावले आहेत. त्यांच्या सोबत समाजकार्यात खांद्याला खांदा लावून उभ्या राहणाऱ्या सुविद्य पत्नी समाजसेविका व गायिका शकुंतला तायडे या डॉ. मेत्ता यांची आत्या आहेत. या दोघांच्या प्रेरणेतूनच डॉ. मेत्ता यांनी वैद्यकीय क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली आहे.

डॉ. मेत्ता ढाले यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांच्या नातेवाईक, आप्तस्वकीय, मित्रपरिवार तसेच डोंगर कठोरा येथील ग्रामस्थांच्या वतीने कौतुकाचा वर्षाव होत आहे. छोट्या खेड्यातून सुरू झालेला त्यांचा वैद्यकीय प्रवास आज अनेक तरुण-तरुणींसाठी प्रेरणादायी ठरला आहे. दृढनिश्चय, परिश्रम आणि कुटुंबीयांच्या पाठबळामुळे मिळवलेले हे यश त्यांच्या आयुष्यातील सुवर्ण पान ठरले असून, ‘डॉ.मेत्ता ढाले’ हे नाव आता वैद्यकीय क्षेत्रात अभिमानाचे प्रतीक म्हणून ओळखले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here