Seth L.N. School : शेठ ला.ना. विद्यालयात डॉ. कलाम जयंती ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरी

0
1

ग्रंथप्रेम अन्‌ विचारप्रेरणेचा संदेश

साईमत/जळगाव/प्रतिनिधी : 

शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ लालजी नारायणजी सार्वजनिक विद्यालयात भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न आणि सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त “वाचन प्रेरणा दिन” उत्साहात साजरा करण्यात आला. उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे, ग्रंथप्रेम जागवणे आणि व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास साधणे हा होता. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्ज्वलन करून केली. याप्रसंगी मुख्याध्यापक सचिन देशपांडे, उपमुख्याध्यापक प्रशांत जगताप, ज्येष्ठ पर्यवेक्षक संजय वानखेडे, पर्यवेक्षिका रमा तारे, ज्येष्ठ शिक्षक सुभाष पाटील, दीपक पाटील, ग्रंथपाल सुनील अंबिकार, जागृती मोराणकर उपस्थित होते.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध लेखकांची आवडती पुस्तके वाचून त्यावरील मनोगते व्यक्त केली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व पटवून देत दररोज वाचनाची सवय लावण्याचे आवाहन केले. ग्रंथपाल सुनील अंबिकार यांनी शाळेच्या वाचनालयातील नवीन पुस्तकांची माहिती देत विद्यार्थ्यांना ग्रंथालयाचा अधिकाधिक उपयोग करण्याचे आवाहन केले. वाचन हे केवळ ज्ञान मिळविण्याचे साधन नसून व्यक्तिमत्त्व आणि विचारघडणीचे प्रभावी माध्यम आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने दररोज वाचनाची सवय लावली तर तो स्वतःच प्रेरणास्थान ठरेल, असे मुख्याध्यापक सचिन देशपांडे यांनी सांगितले. यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here