जयपुरातील निर्वाण विश्वविद्यालयात ‘मन, मनोविकार आणि मनोचिकित्सा’वर संशोधन
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
एमआयडीसीतील मेक मास्टर इंजिनिअरिंग प्रा. लि.,चे संचालक किरण भंगाळे यांच्या पत्नी तथा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील योगशास्त्र विभागाच्या सहायक प्राध्यापिका डॉ. गीतांजली भंगाळे यांनी योग विषयात पीएच.डी. पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी “विभिन्न योग ग्रंथों में वर्णित मन, मनोविकार और मनोचिकित्सा का एक सैद्धांतिक अध्ययन” विषयावर संशोधन केले. हे संशोधनकार्य डॉ. नितीन कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले.
मानवी मनाचे चंचल स्वरूप, त्यातून निर्माण होणारे तणाव, नैराश्य, चिंता यांसारखे मानसिक व शारीरिक विकार तसेच त्यावरील योगग्रंथांतील उपाययोजना यांचा या प्रबंधात सखोल अभ्यास केला आहे. श्रीमद् भगवद्गीतेतील अभ्यास–वैराग्य संकल्पना आणि पतंजल योगसूत्रांतील क्रियायोग, मैत्री, करुणा, मुदिता या संकल्पनांचे मनोचिकित्सात्मक महत्त्व त्यांनी स्पष्ट केले आहे.
संशोधनासाठी निर्वाण विश्वविद्यालय, जयपूरचे कुलपती प्रा. एस. एल. गोदरा, रिसर्च डायरेक्टर डॉ. राजेश कुमार कासवान, डॉ. सपना नेहरा व डॉ. पियुष कुमार यांचे मार्गदर्शन तर योगशास्त्र विभाग प्रमुख इंजि. राजेश पाटील, सहायक प्राध्यापिका (योग थेरपी) डॉ. लीना चौधरी यांचे सहकार्य लाभले. डॉ. भंगाळे यांच्या यशाबद्दल जळगाव विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. व्ही. एल. महेश्वरी यांनी अभिनंदन केले आहे. तसेच शैक्षणिक, सामाजिक वर्तुळातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
