हिंदी–मराठी पत्रकार संघाचा ‘दर्पण रत्न पुरस्कार २०२६’ जाहीर
साईमत/लोहारा, ता.पाचोरा /प्रतिनिधी :
लोहारा येथील डॉ.जे.जी.पंडित विद्यालयाचे माजी विद्यार्थी व सध्या तक्षशिला विद्यालय,महाविद्यालय, मुंबई विभागात कार्यरत असलेले डॉ. अर्जुन भोई यांना हिंदी-मराठी पत्रकार संघ (आयएसओ ९००१-२०१५ मानांकन प्राप्त) यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय ‘दर्पण रत्न पुरस्कार २०२६’ जाहीर झाला आहे.
वृत्तपत्र सेवेबरोबरच सामाजिक, शैक्षणिक, चित्रपट, सहकार, नाट्य व राजकीय क्षेत्रातील त्यांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या कार्याची देशपातळीवरही ओळख असून यापूर्वी त्यांना नॅशनल आयडियल टीचर अवॉर्ड (कोल्हापूर), राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार (जेजुरी) तसेच राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार (पुणे) देऊन सन्मानित करण्यात आले.याशिवाय अमेरिकन युनिव्हर्सिटी, नवी दिल्ली यांनी त्यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करून गौरविले आहे.
दादासाहेब फाळके इंटरनॅशनल सिने अवॉर्ड (पुणे), बाराबलुतेदार भूषण, खान्देशभूषण, भोई समाजभूषण महाराष्ट्र अशा अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांचे ते आतापर्यंत मानकरी ठरले आहेत.डॉ. अर्जुनभोई यांच्या या सन्मानाबद्दल शैक्षणिक, सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
