धारदार शस्त्राने वार करून अज्ञात हल्लेखोराचा थरकाप; आरोपीच्या शोधासाठी विशेष पथके रवाना
साईमत / पुणे
पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे घडलेल्या दुहेरी हत्याकांडाने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ठाकर वस्ती परिसरात एका वृद्ध महिलेची आणि सहा वर्षांच्या चिमुकलीची अज्ञात व्यक्तीकडून अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देवाची आळंदी येथे बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. मंगला चंद्रकांत शिंदे (वय ७०) आणि धनश्री केदारे (वय ६) या दोघी घरात झोपलेल्या असताना अज्ञात व्यक्तीने घरात घुसून धारदार शस्त्राने त्यांच्यावर वार केले. गंभीर जखमी झालेल्या दोघींचा अतिरक्तस्रावामुळे जागीच मृत्यू झाला.
धनश्रीची आजी संगीता केदारे (वय ४७) या नेहमीप्रमाणे हाउसकीपिंगच्या कामासाठी रात्री एका खासगी रुग्णालयात गेल्या होत्या. त्या वेळी त्यांनी नात धनश्रीला शेजारी राहणाऱ्या मंगला शिंदे यांच्या ताब्यात सोपवले होते. मात्र, याच संधीचा फायदा घेत अज्ञात हल्लेखोराने घरात प्रवेश करून हा भीषण प्रकार घडवला.
घटनेची माहिती मिळताच आळंदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणी संगीता केदारे यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
या दुहेरी हत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट असून, पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत तपासाची सूत्रे हाती घेतली आहेत. आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पोलिस पथकेही तयार करण्यात आली असून लवकरच या प्रकरणाचा उलगडा होईल, असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
