बुलडाणा : सोन्याच्या दागिन्यांच्या दुकानातून चोरी करणारी एक महिला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दुकानदाराच्या समोरुन सोन्याची पोत लांबवणाऱ्या महिलेची हातचलाखी कुणाच्याच नजरेत आली नाही. मात्र सीसीटीव्हीने या महिलेचा बरोबर पकडलं. अखेर या चोरट्या महिलेची ओळख पटली असून आता तिचा शोध घेणं सुरु आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोघा अज्ञात महिलांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढीत तपास आता केला जातो आहे. बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर शहरातील सराफा दुकाना 22 ग्रॅम सोन्याची पोत चोरण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. अखेर सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर खरेदीच्या बहाण्याने दुकाना शिरलेल्या दोघींपैकी एकीने विक्रेत्यांना गंडवून सोन्याची पोत लांबवली असल्याच स्पष्ट झालं आहे.
मेहकर शहरात सराफा दुकानांमध्ये चोऱ्या होण्याचं प्रमाण वाढलंय. महिलांकडून सातत्यानंतर सराफा विक्रेत्यांच्या डोळ्यात धूळ फेकून चोऱ्या केल्या जात असल्याचे प्रकार समोर आले होते. अखेर चोऱ्या करणाऱ्या दोघा महिलांना सीसीटीव्हीच्या नजरेनं कैद केलं असून आता या महिलांना अटक करण्यासाठी पथकं तैनात करण्यात आली आहे.
..अशी केली चोरी!
बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर येथील राजेश उमाळकर यांचे मालकीचे रेणुका ज्वेलर्स दुकान आहे. नेहमीप्रमाणे त्यांनी दुकान उघडले असता दोन महिला दुकानात सोन्याची पोत घेण्यासाठी आल्या. दुकानातील कामगारांना त्यांनी पोत दाखवण्यास सांगितली असता एक महिला कामगारांना पोत दाखवण्यास गुंतवते, तर दुसरी महीला एक लाख पंधरा हजारांची पोत हातात घेऊन मागील पिशवीत टाकते आणि चोरी करते. ही चोरी दोघा विक्रेत्यांच्या समोरच केली जाते.
मंगळवारी सव्वा अकरा साडे अकरा वाजण्याच्या सुमारात चोरीची ही घटना घडली. या दरम्यान, एक महिला दागिने घालून आरशात पाहतेही. त्यानंतर इतर काही दागिने दाखवण्यासही सांगितलं जातं. तर दोघे विक्रेत दुकानात महिलांना दागदागिने दाखवत असतात. त्या दरम्यान, दोघींपैकी एक महिला हातचलाखीने चोरी करते.