डोणगावला इंग्लिश मीडियम स्कुल संस्था चालकाचा आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास नकार…?

0
26

साईमत, यावल : प्रतिनिधी

तालुक्यातील डोणगाव येथील इंग्लिश मीडियम स्कुलमध्ये पहिलीपासून प्रवेश घेतलेल्या मुलांना दहावीत प्रवेश देण्यासाठी संस्थाचालकांनी नकार दिल्याने दीडशे ते दोनशे विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनी गुरुवारी, २० जून रोजी यावल येथे आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात येऊन आपली कैफियत मांडली. या प्रकरणात प्रथमदर्शनी असे दिसून आले आहे की, संस्था चालकांना आदिवासी विभागाकडून थकीत बिल न मिळाल्याने संस्थाचालकांनी आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास नकार दिल्याचे चर्चिले जात असले तरी दुसरीकडे पहिलीपासून ज्या शाळेत आदिवासी मुलांनी शिक्षण घेत आहे, त्या शाळेत विद्यार्थ्यांना नववी व दहावीमध्ये प्रवेश मिळत नसल्याने त्यात आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय प्रकल्प अधिकारी तसेच संस्था चालकांचा समन्वय नसल्याने आदिवासी विद्यार्थ्यांची पिळवणूक होत आहे. त्यांना प्रवेश मिळत नसल्याचे त्यांच्यात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

आदिवासी विद्यार्थ्यांना डोणगाव येथील इंग्लिश मीडियम स्कुलमध्ये प्रवेश का दिला जात नाही, संस्थाचालकांनी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय प्रकल्प अधिकारी यांच्याकडे विद्यार्थ्यांना प्रवेश न देण्याबाबत लेखी पत्र दिले ते लेखी पत्र संस्था चालकांनी कोणत्या नियमानुसार दिले? आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेताना विद्यालयाचे तसेच संस्था चालकांनी घालून दिलेल्या अटी शर्ती नियमांचे पालन करीत नाही का? आदिवासी विद्यार्थ्यांनी विद्यालयात शिक्षण घेताना किंवा निवासी असताना काही चुकीची वागणूक देऊन संस्था चालकांच्या शैक्षणिक कामकाजामध्ये अडथळा निर्माण केला आहे का? आदी अनेक विषयांबाबत आदिवासी संघटनांनी डोणगाव येथील शिक्षण संस्था आणि आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी यांच्याशी समन्वय साधून आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्लिश मीडियम स्कुलमध्ये प्रवेश कसा मिळेल, याबाबत समन्वय साधला पाहिजे, असे संपूर्ण शिक्षण क्षेत्रात चर्चिले जात आहे.

प्रकल्प अधिकाऱ्यांचा ‘नो रिप्लाय’

याबाबत प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांच्याशी भेटण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ‘नो रिप्लाय’ झाला आहे. त्यांची कार्यालयीन वेळेत कार्यालयात भेट न झाल्याने ते शासकीय कामानिमित्त बाहेर गेली की, कार्यालयात उशिराने येणार आहेत? याबाबतही माहिती मिळाली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here