साईमत, नांदेड : वृत्तसंस्था
एकीकडे समाजात वडील-मुलांमध्ये वाद विकोपाला जात असल्याच्या घटना वरच्या वर येताना दिसतात. पिता-पुत्रामधील वादांच्या घटना खूनापर्यंत गेल्याचंही पाहायला मिळतं. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत मुलीच आपल्या आई-वडिलांना साथ देतात, सांभाळ करतात, तर मुलं आई वडिलांची साथ सोडून आपल्याच संसारात व्यस्त होतात, अशी भावना अनेकांमध्ये निर्माण होऊ लागली आहे. मात्र या समजाला नांदेडच्या एका 25 वर्षीय डॉक्टर मुलाने फाटा दिला आहे.
जन्मदात्याला स्वतःच्या यकृताचा काही भाग दान करुन मुलाने जीवनदान दिले आहे. डॉ मयुरेश गव्हाणे असं या मुलाचं नाव आहे. त्याने समाजापुढे ठेवलेल्या या आदर्शाचे सर्वत्र कौतुक होतं आहे. नांदेड शहरातील रहिवासी असलेले डॉ मयुरेश गव्हाणे यांचे वडील गोिंवद गव्हाणे हे व्यवसायाने शिक्षक आहेत. लोहा तालुक्यातील मारतळा येथील जिल्हा परिषद शाळेत ते कार्यरत आहेत. त्यांचा मुलगा मयुरेश याने नांदेड मध्ये एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण केले असून दिल्ली येथे यूपीएससीची तयारी करत आहे.
मागील काही दिवसा पासून त्यांचे वडील हे आजारी होते. त्यांना यकृतचा आजार होता. नांदेड मधील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी त्यांना तात्काळ हैदराबाद येथे जाण्याचा सल्ला दिला. नातेवाईकांनी तात्काळ त्यांना हैदराबाद येथील एआयजी रुग्णालयात दाखल केले. तपासणी केली असता यकृत पूर्णपणे खराब झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
त्यांचे आयुष्य एक महिनाच होते
यकृत न बदलल्यास केवळ एका महिन्यापर्यंतचं ते तग धरु शकतील, असे तेथील डॉक्टरांनी नातेवाईकांना सांगतिले. त्यानंतर कुटुंबियांना धक्का बसला. यकृत कुठून आणायचे हा प्रश्न कुटुंबियासमोर निर्माण झाला होता.