साईमत, नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशभरातील महिलांना मोदी सरकारने राखी पोर्णिमेच्या एक दिवस आधी भेट दिली आहे. उद्यापासून म्हणजे बुधवारपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती २०० रुपयांनी कमी होणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी केली आहे.
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी सांगितले की, ओनम आणि राखी पोर्णिमेच्या निमित्ताने मोदी सरकारने देशभरातील महिलांना गिफ्ट दिले आहे. बुधवारपासून देशात घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती २०० रुपयांनी कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत ७५ लाख भगिनींना मोफत गॅस कनेक्शन मिळणार आहे.. त्यासाठी त्यांना एक रुपयाही द्यावा लागणार नाही. पाईप, स्टोव्ह आणि सिलेंडरही मोफत मिळेल. जगभरात गॅसच्या किमती वाढल्या आहेत, मात्र भारतात त्याचा परिणाम कमी आहे. अनुराग ठाकुर म्हणाले की, उज्ज्वला योजनेंतर्गत यापूर्वी २०० रुपये अनुदान होते, तर आजपासून त्यावर २०० रुपयांच्या व्यतिरिक्त अनुदानाचा लाभ मिळणार आहे. म्हणजेच आता उज्ज्वला योजनेत येणाऱ्यांना ४०० रुपये अनुदान मिळणार आहे. ३३ कोटी लोकांकडे गॅस सिलेंडर कनेक्शन आहेत. त्याचबरोबर ७५ लाख नवीन कनेक्शन दिले जाणार आहेत. त्यासाठी ७६८० कोटी खर्च येणार आहे.
उज्ज्वला सिलेंडरसाठी केंद्र सरकार प्रत्येक कनेक्शनसाठी ३६०० रुपये खर्च करत असून आतापर्यंत ९.६० लाख महिलांना उज्ज्वला सिलेंडरचा लाभ देण्यात आल्याचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी सांगितले. आताही यामध्ये ७५ लाख नवीन महिलांना उज्ज्वला योजनेचा लाभ देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मोदी सरकार २०१४ साली ज्याव्ोळी सत्तेत आले होते. त्याव्ोळी १४.५ कोटी लोकांकडे गॅस कनेक्शन होते. पण आता देशातल्या ३३ कोटी लोकांकडे गॅस कनेक्शन असल्याचे मंत्री ठाकुर यांनी सांगितले. घरगुती गॅस सिलेंडरची किंमत सध्या ११०० रुपयांच्या वर असून मोदी सरकारच्या या ताज्या निर्णयामुळे बुधवारपासून ती ९०० रुपयांपर्यंत कमी होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळणार आहे.