कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे ७६ वर्षीय महिला रुग्णालयात दाखल
साईमत भुसावळ प्रतिनिधी
सुनसगाव येथील खंडेराव मंदिर परिसरात बुधवारी (दि. २६ मार्च) एका गंभीर घटनेत ७६ वर्षीय चंद्रभागाबाई चावदस पाटील यांना भटक्या कुत्र्यांच्या अचानक हल्ल्यात गंभीर जखमा झाल्या. महिला आपल्या घराजवळ जात असताना अचानक काही भटक्या कुत्र्यांच्या गटाने त्यांच्यावर हल्ला केला. स्थानिकांच्या माहितीनुसार, महिलेला उजव्या पायावर अनेक ठिकाणी चावा लागल्यामुळे गंभीर दुखापत झाली.
घटनेनंतर तातडीने स्थानिक रहिवाशांनी प्राथमिक उपचार केले व नंतर जळगाव येथील सामान्य रुग्णालयात त्यांना दाखल केले गेले. महिलांच्या प्रकृतीची वैद्यकीय तपासणीनंतर परिस्थिती स्थिर असल्याचे रूग्णालयाकडून सांगण्यात आले आहे.
स्थानिकांनी सांगितले की, सुनसगाव परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या गेल्या काही महिन्यांपासून वाढत असून गल्ल्यांमध्ये त्यांच्या गटांना वारंवार पाहिले जाते. नागरिकांना घरी जाताना विशेष काळजी घेण्याची गरज आहे. अनेक रहिवाशांनी स्थानिक प्रशासनाकडे भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्वरित आणि प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भीती निर्माण केली असून, प्रशासनाकडून त्वरीत कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
