महावितरणचे आवाहन, अधिकृत विजेनेच उजळवा ‘नवरात्रोत्सव’
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
घटस्थापनेने सोमवारी, २२ सप्टेंबरपासून नवरात्रोत्सवाची सुरुवात होत आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आणि अपघातांना आळा घालण्यासाठी नवरात्रोत्सव मंडळांनी केवळ अधिकृत वीजजोडणी घेऊनच उत्सव साजरा करावा, असे आवाहन महावितरणतर्फे केले आहे.
महावितरणने सार्वजनिक मंडळांसाठी तात्पुरत्या वीजजोडणीची सोय केली आहे. ती घरगुती दरात उपलब्ध आहे. रोषणाई, देखावे, मंडप, महाप्रसाद आदींसाठी लागणारी विजेची कामे फक्त अधिकृत वीज कंत्राटदारांकडूनच करून घ्यावीत. अनधिकृत किंवा बेकायदेशीर जोडण्या केल्यास शॉर्टसर्किट, आगीचे अपघात किंवा जीवितहानीचा धोका संभवतो, असा इशारा महावितरणने दिला आहे. महावितरणच्या सूचनांनुसार, मंडपातील वायरिंग नेहमी सुव्यवस्थित व प्रमाणित असावे. मीटर व स्विचजवळचा परिसर मोकळा ठेवावा.आवश्यकतेनुसार वीजपुरवठा बंद करण्यासाठी एकाच स्विचची सोय असावी. दर्जेदार वायर, स्विच आणि इन्सुलेशन टेपचाच वापर करावा. मंजूर वीजभारापेक्षा जास्त विजेचा वापर होणार नाही याची दक्षता घ्यावी.
मंडळांना तात्पुरत्या जोडणीसाठी अनामत रक्कम भरावी लागणार
आपत्कालीन मदतीसाठी महावितरणचे टोल-फ्री क्रमांक १९१२, १८००-२३३-३४३५ आणि १८००-२१२-३४३५ हे २४ तास उपलब्ध असतील. तसेच स्थानिक अभियंता व तंत्रज्ञांचे संपर्क क्रमांकही मंडळांनी जवळ ठेवावेत, असे सांगण्यात आले आहे. तात्पुरत्या जोडणीसाठी आवश्यक असलेली अनामत रक्कम मंडळांनी भरावी लागणार आहे. ती ऑनलाईन भरल्यास उत्सव संपल्यानंतर वीजबिल वजा करून उरलेली रक्कम तातडीने परत केली जाईल. त्यामुळे प्रक्रिया अधिक पारदर्शक व सुलभ होईल.
