सावदा पोलीस स्टेशनतर्फे एपीआय विशाल पाटील यांनी केले आवाहन
साईमत/सावदा, ता.रावेर/प्रतिनिधी
शाळांसह सरकारी कार्यालयांना दिवाळीनिमित्त सुट्टी लागली आहे. त्यामुळे बहुतांश कुटुंब हे दिवाळी सण साजरा करण्यासाठी त्यांच्या मूळ गावी किंवा नातेवाईकांकडे जातात. त्यावेळी त्यांच्याकडील मुल्यवान वस्तु, रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने हे बंद घरात न ठेवता त्यांनी बँकेच्या लॉकरमध्ये ठेवाव्यात किंवा सोबत घेवून जावे. कारण आपल्या मौल्यवान वस्तुंच्या सुरक्षिततेसाठी घर बंद करुन बाहेरगावी जात असल्यास त्याबाबत आपल्या आजूबाजूला राहत असलेल्या किंवा पोलिसांना कळविणे आवश्यक आहे. गल्लीतील बहुतांश कुटुंब हे सुट्टीवर जात असल्यास त्यांनी काही दिवसांकरीता गल्लीत रात्रीच्या गस्तीसाठी गुरखा नेमावा आणि त्याबाबत स्थानिक पोलीस स्टेशनला कळवुन तेथे रात्रीची गस्त करण्याची मागणी करावी. परिसरात संशयित व्यक्ती आढळून आल्यास किंवा त्यास पकडून ठेवल्यास परिसरातील नागरिकांनी त्यास मारहाण करु नये, असे आवाहन सावदा पोलीस ठाण्याचे एपीआय विशाल पाटील यांनी केले आहे.
नागरिकांनी बंद घराच्या परिसरातीत लाईट सुरु राहील, अशी व्यवस्था करावी, आपल्या गल्लीत किंवा घराचा परिसर दिशेतील अशा ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा प्रयत्न करावा. तसेच आपले शेजारी आजूबाजूला राहत असलेल्या नागरिकांशी सतत संपर्कात रहावे. आपला शेजारी राहणारा ‘हा खरा पहारेकरी’ अशा म्हणीप्रमाणे आपले शेजारी यांना आपण बाहेरगावी जात असल्यास विश्वासात घेवून कळविणे आवश्यक असल्याचेही एपीआय विशाल पाटील यांनी सांगितले.
संशयित व्यक्ती परिसरात आढळल्यास ११२ वर डायल कॉल करा
आपल्या आयुष्याची कमाई ही बंद घरात ठेवून पश्चातापाची वेळ आणु नका. ती सुरक्षितरित्या बँकेच्या लॉकरमध्ये ठेवावी. रात्री- अपरात्री कुठलाही संशयित व्यक्ती गल्लीत फिरतांना आढळल्यास पोलीस स्टेशनशी संपर्क करावा किंवा डायल ११२ वर कॉल करुन पोलिसांना अवगत करावे, असेही आवाहन सावदा पोलीस ठाण्याचे एपीआय विशाल पाटील यांनी केले आहे.