साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी
गेल्या अनेक दशकांपासून ज्याची सर्व भारतवासी आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण अर्थातच अयोध्या येथे प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिर उभे राहत आहे. श्रीराम मंदिर उभारणीचा येत्या सोमवारी, २२ जानेवारी २०२४ ला मंदिरात भव्य दिव्य स्वरूपात श्रीराम लल्ला यांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. अशा सुवर्णक्षणाचा साक्षीदार होण्यासाठी मुक्ताईनगर शहरासह तालुक्यात विविध कार्यक्रम घेण्यासाठी सर्व समाजसेवी संघटना, सामाजिक संघटना, श्रीराम भक्तांचे मार्गदर्शन मिळावे, यासाठी सार्वजनिक चर्चासत्राचे सोमवारी, ८ जानेवारी २०२४ रोजी मुक्ताईनगर येथील शासकीय विश्रामगृह येथे आ.चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन केले होते.
ते पुढे म्हणाले की, आपल्या सर्वांसाठी २२ जानेवारी हा भाग्याचा सुवर्णक्षण आहे. त्याची जगाच्या पाठीवर इतिहासात नोंद होणार आहे. मुक्ताईनगर येथे दिवाळी साजरी होणार आहे. यासाठी २५ हजार झेंडे देण्यात येणार आहे. मुक्ताईनगर येथील प्रवर्तन चौकात व्याख्यानाचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. २२ जानेवारीला अयोध्येला जाणे सर्वांसाठी शक्य नाही. नंतरच्या काळात सर्व भक्तांना अयोध्येला रेल्वेने घेऊन जाईल, असे आश्वासन दिले. तालुक्यातील श्रीराम मंदिराचे नूतनीकरण रंगोटी केली जाईल. तसेच तालुक्यातील कारसेवकांचा सत्कार करण्यात येईल, असे आ.पाटील यांनी सांगितले.
मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. रवींद्र महाराज हरणे यांनी बोलताना कोथळी मुक्ताईनगर हे एक धाम आहे. सर्वांनी अंगणात रांगोळी, घराला तोरण, गुढी पताका, आकाश कंदील, राम स्तोत्र, राम नामाचा जप करावा आणि सुवर्णक्षणाचे आपण सर्व साक्षीदार व्हावे, असे सांगितले. मुक्ताईनगर हे संत मुक्ताईच्या पावन पदस्पर्शाने पुनीत झालेले तीर्थक्षेत्र आहे. शहरातील प्रवर्तन चौकापासून ते जे.ई.स्कुलपर्यंत व संत मुक्ताबाई महाविद्यालयापर्यंत रस्त्याच्या बाजूला लागून असलेली उघड्यावरील मास विक्रीची दुकाने प्रशासन अधिकाऱ्यांनी कायमची बंद करावी, असेही सांगितले. अनेक मान्यवर भक्तांनी चर्चा सत्रात सहभाग घेत आपल्या सूचना मांडल्या.
याप्रसंगी ह.भ.प. उद्धव जुनारे महाराज, रामरोटी आश्रमाचे अध्यक्ष किशोर गावंडे, डी.एस.चव्हाण, डॉ. मनोज महाजन, डॉ. विक्रांत जयस्वाल, पूनमचंद जैन, पुरुषोत्तम वंजारी, विशाल सापधरे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आर.टी.जोगी, संजय कांडेलकर, ॲड.तुषार पटेल, कारसेवक यांच्यासह मुक्ताईनगर शहरातील समाजसेवी संघटना, सामाजिक संघटना, सार्वजनिक गणेश मंडळ, दुर्गादेवी उत्सव मंडळ, सर्व हिंदू धर्म संघटना, सिव्हील सोसायटी, श्रीराम भक्त उपस्थित होते.