सजावट, फराळ अन् खरेदीसाठी धडाक्यात रंगला बाजार
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरातील बाजारपेठा खरेदीसाठी गजबजल्या आहेत. त्यातच शहरातील फुले मार्केट, महात्मा गांधी रोड, नवीपेठ आणि इतर प्रमुख बाजारपेठ परिसर जळगावकरांच्या गर्दीने ओसंडून वाहत आहेत. अशा ‘बंपर’ खरेदीमुळे स्थानिक अर्थकारणाला मोठा चालना मिळाली असून, कोट्यवधींची उलाढाल नोंदवली जात आहे. दरम्यान, सजावट, फराळासह विविध साहित्याच्या खरेदीसाठी बाजार धडाक्यात रंगल्याचे सद्यस्थितीला चित्र आहे.
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शहरभर उत्साह आणि लगबग पाहायला मिळत आहे. रंगीबेरंगी आकाशकंदील, रांगोळी साहित्य, रेडीमेड तोरणे, विविध प्रकारच्या पणत्या व विद्युत रोषणाईसाठी नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत. घरातील सजावटीसाठी वस्तू, नवीन कपडे, मिठाई आणि दिवाळी फराळही मोठ्या प्रमाणात खरेदीला आले आहेत. लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळेच खरेदीच्या उत्साहात मग्न दिसत आहेत.
शहरातील वाहतूक व्यवस्थेवर गर्दीमुळे वाढला ताण
बाजारपेठेत वाढलेल्या गर्दीमुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण पडला आहे. फुले मार्केटजवळ शास्त्री टॉवरसमोरून काही मार्गांवर ‘नो एन्ट्री’ बॅरिकेट्स लावून पोलिसांनी प्रयत्न केले आहेत. तरीही दुचाकीस्वार आणि इतर वाहनधारकांना वळण रस्त्यांवरून जावे लागते, ज्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे. किरकोळ विक्रेत्यांनी रस्त्यांचा मोठा भाग व्यापल्यामुळे सायंकाळी वाहतुकीची कोंडी अधिक गंभीर होते. पादचाऱ्यांना चालणेही अवघड झाले आहे. त्यामुळे वाहनधारकांना मार्ग काढण्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागत आहे. ग्राहकांचा खरेदीचा उत्साह जरी मोठा असला तरी, वाहतूक समस्येमुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करून दिवाळीच्या दिवसात वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.