प्रदूषणमुक्त दिवाळीचा संदेश देत रंगला सणाचा उत्सव
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील प्रेमनगरातील बी.यू.एन. रायसोनी स्कुलमध्ये (सी.बी.एस.ई. पॅटर्न) बुधवारी, १५ ऑक्टोबर रोजी दिवाळीचा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शाळेच्या पालक-शिक्षक संघाच्या सदस्या कुमुदीनी पाटील, ज्योती सोनवणे, सुवर्णा पाटील उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती देवी, लक्ष्मीमातेच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीपप्रज्ज्वलन करून झाली.
इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी दिवाळीतील विविध दिवसांचे वसुबारस, धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा, पाडवा, भाऊबीज यांचे महत्व नाटिकेद्वारे सादर केले. तसेच ‘समुद्रमंथन’ ही कथा नाटिकेच्या माध्यमातून सादर केली.
शाळेचे मुख्याध्यापक मनोज शिरोळे यांनी विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले. शेवटी पाहुण्यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. उपक्रमाच्या यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष शिरीष रायसोनी, उपाध्यक्ष उमेद रायसोनी यांनी सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. सुत्रसंचालन सातवीतील तेजवर्धन सिंह आणि आठवीतील पूर्वा खळसे यांनी केले.