साईमत जळगाव प्रतिनिधी
येथील पोलीस मुख्यालयातील मंगलम हॉल मध्ये जिल्हा पोलीस दलाच्या वतीने शनिवारी १ जूलै रोजी सकाळी ११ वाजता तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस उपअधिक्षक संदीप गावीत यांच्या उपस्थितीत जवळपास १५० तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत.
जिल्हा पोलिस दलाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकांच्या तक्रारींचे निरसन व्हावे म्हणून तक्रार निवारण दिन ही संकल्पना राबविण्यात येते. महिन्याच्या प्रत्येक आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी जळगाव शहरात तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात येते. यात नागरिकांच्या प्रलंबित तक्रारी नुसार त्यांना तक्रार निवारण दिनाचे दिवशी बोलावण्यात येते. त्यावेळी अर्जदार आणि ज्याच्या विरोधात तक्रार आहे अशा दोघांना बोलावण्यात येते. यात नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेवून त्या निकाली काढल्या जातात. यावेळी संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तसेच कर्मचारी सुद्धा याठिकाणी उपस्थित असतात. पूर्ण आठवडाभरात तक्रारींची यादी तयार करून त्यानुसार तक्रारदार यांना बोलावण्यात येते. या अनुषंगाने पोलीस मुख्यालयातील मंगलम हॉल येथे तक्रार निवारण दिन साजरा करण्यात आला.
यावेळी शनिपेठ ठाण्याचे एकूण ८६ अर्ज प्रलंबित होते त्यापैकी ५० अर्ज तर जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे १६० अर्जांपैकी १०० अर्ज असे एकूण १५० अर्ज निकाली काढण्यात यश आले आहे. दरम्यान, येत्या तीन ते चार दिवसात उर्वरित अर्ज सुद्धा निकाली काढण्याचा प्रयत्न राहणार आहे. तक्रारीमध्ये जास्तीत जास्त तक्रारी या दिवाणी स्वरूपाच्या असतात. तर एकमेकांविरोधात तक्रार असेल तर त्यानुसार दोघांनी सुनावणी घेवून कारवाई केली जाते. यावेळी तक्रारदार नागरिकाचा या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद लाभला.