रात्रीच्या डंपरवर कारवाई, ग्रामस्थांचे समाधान व्यक्त
साईमत /शिरसोली / प्रतिनिधी –
तालुक्यातील शिरसोली ते कुऱ्हाडदा रस्त्यावर रात्री बेफाम अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरविरोधात सोमवारी रात्री जिल्हाधिकाऱ्यांच्या पथकाने ठोस कारवाई केली. नागरिकांच्या तक्रारींवर त्वरित प्रतिसाद देत तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई राबवण्यात आली आहे.
शिरसोली परिसरातील ग्रामस्थांनी रात्री वाळू माफियांचे डंपर बेफामपणे धावत असल्याने झालेल्या त्रासाबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. या वाहतुकीमुळे नुसती झोप खंडित होत नाही तर नदीतील वाळू उपशामुळे खड्डे पडत असून महसूलही बुडत असल्याचे ग्रामस्थांनी तक्रार केली होती.
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी या तक्रारी गंभीरपणे घेत तहसीलदारांना कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार सोमवारी रात्री १० वाजता झुलेलाल वॉटर पार्कजवळ एका डंपरला शिरसोली व वावडदा दरम्यान अडवले गेले. या डंपरकडे कोणताही वाळू परवाना नसल्याचे आढळल्यामुळे त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली.
कारवाईत नायब तहसीलदार राहुल वाघ, शिरसोली मंडळ अधिकारी सारीखा मॅडम, अजिंक्य आधळे, शिरसोली तलाठी मयुर महाले, म्हसावद तलाठी सुरेश चौधरी व इतर सरकारी कर्मचारी उपस्थित होते.
ग्रामीण नागरिकांनी या कारवाईबाबत समाधान व्यक्त केले असून, भविष्यात अशाच प्रकारची सातत्यपूर्ण कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांचा हा उपक्रम अवैध वाळू वाहतुकीवर नियंत्रण आणण्याच्या दिशेने महत्त्वाचा पाऊल ठरला आहे.
