साईमत, मलकापूर : प्रतिनिधी
बुलढाणा जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातर्फे आयोजित जिल्हास्तरीय शालेय दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आयोजक मलकापूर जैन महिला मंडळ संचालित भगवान महावीर निवासी मूकबधिर विद्यालय आणि मतिमंद बालक प्रशिक्षण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने क्रीडा स्पर्धा 2024 आयोजित केल्या होत्या. स्पर्धेत जिल्ह्यातील सर्व दिव्यांग शाळांनी सहभाग नोंदविला आहे. स्पर्धेचे उद्घाटन मलकापुरचे आ. राजेश एकडे यांच्या हस्ते स्पर्धेला हिरवी झेंडी दाखवून नुकतेच करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत, ॲड. एस. एस. मोरे, ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप काळे, तहसीलदार राहुल तायडे, समाज कल्याण विभागाचे एस.एम. पुंड, पुरुषोत्तम राठी, मनीष लखानी, सुभाष पाटील, श्री जैन महिला मंडळाच्या अध्यक्ष बसंतीदेवी संचेती, संस्थेचे कार्यवाह सचिव अमरचंद संचेती, मुख्याध्यापक आनंद वाघ, संजय पाटील, दोन्ही शाळांचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सर्व शाळांचे पथसंंचालन करून झाली. यावेळी सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांनी आपले खेळाचे कौशल्य दाखविले. गतिमंद प्रवर्ग विभागाच्या स्पर्धा प्रमुखपदी आनंद वाघ, मूकबधीर प्रवर्ग विभागाच्या स्पर्धा प्रमुखपदी जगधने, अस्थिव्यंग प्रवर्गाच्या स्पर्धा प्रमुखपदी शुभम बांगडे, अंधप्रवर्ग विभागाच्या प्रमुखपदी निळकंठ अंदुरकर होते. यावेळी स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसाचे वितरण करण्यात आले. यशस्वीतेसाठी मलकापूर गतिमंद बालक प्रशिक्षण केंद्र आणि भगवान महावीर निवासी मूकबधिर विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.