साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि बी.पी.आर्ट्स एस.एम.ए.सायन्स, अँड के.के.सी कॉमर्स कॉलेज, चाळीसगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव जिल्हास्तरीय आविष्कार २०२३-२४ स्पर्धेचे आयोजन बुधवारी, १८ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या बी.पी. आर्ट्स, एस.एम.ए.सायन्स अँड के.के.सी कॉमर्स कॉलेजच्या परिसरात केले आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संशोधनाचे महत्त्व कळावे, त्यांना संशोधनाकरीता प्रोत्साहित करण्यासाठी तसेच संशोधक, विद्यार्थी व प्राध्यापकांना आपल्या संशोधनाचे सादरीकरण करण्याची संधी उपलब्ध करून देण्याच्या हेतूने विद्यापीठाच्या मार्गदर्शनानुसार स्पर्धांचे आयोजन केले आहे. स्पर्धेत कला, साहित्य, वाणिज्य, व्यवस्थापन, विधी, विज्ञान, कृषी, पशुवैद्यकशास्त्र, अभियांत्रिकी, वैद्यकशास्त्र आणि औषधनिर्माणशास्त्र अशा विविध विषयांमधील संशोधनपर पोस्टर व मॉडेल सादर करण्यात येतील.
आविष्कार स्पर्धेसाठी १ हजारापेक्षा जास्त विद्यार्थी, प्राध्यापक व संशोधक सहभागी होणार आहेत. स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील जास्तीत जास्त महाविद्यालयाच्या संघांनी सहभागी होऊन तसेच विद्यार्थी, संशोधकांनी विविध विषयातील संशोधन प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. यशस्वीतेसाठी विविध महाविद्यालयीन समित्या कार्यरत असून सर्व कर्मचारी, विद्यार्थी परिश्रम घेत आहेत.