शैक्षणिक, निवासी व पायाभूत सुविधांचा सखोल आढावा घेतला.
साईमत/भुसावळ/प्रतिनिधी
भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे कार्यरत असलेल्या जवाहर नवोदय विद्यालयास जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी भेट देऊन विद्यालय परिसरातील विविध विभागांची सविस्तर पाहणी केली. या भेटीत त्यांनी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या शैक्षणिक, निवासी व पायाभूत सुविधांचा सखोल आढावा घेतला.
भेटीदरम्यान विद्यालयातील अध्यापन व्यवस्था व शैक्षणिक सुविधा, पाणीपुरवठा व स्वच्छता व्यवस्था, क्रीडा साहित्य व क्रीडा सुविधा, प्रयोगशाळा तसेच वाचनालयाची उपलब्धता यांची तपासणी करण्यात आली. यासोबतच विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था, भोजन व दैनंदिन सोयीसुविधांची स्थितीही जिल्हाधिकाऱ्यांनी पाहिली.
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी विद्यार्थ्यांशी खेळीमेळीच्या वातावरणात संवाद साधत त्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत माहिती घेतली. स्पर्धा परीक्षा, करिअर नियोजन व व्यक्तिमत्त्व विकासाच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत त्यांनी अभ्यासात सातत्य, आत्मविश्वास व ध्येयस्पष्टता यांचे महत्त्व अधोरेखित केले. इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना आगामी परीक्षांसाठी शुभेच्छा देत आत्मविश्वासाने यश संपादन करण्यासाठी प्रेरित केले.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गुणवत्तापूर्ण, सुरक्षित व पोषक शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची प्राधान्याची बाब असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी नमूद केले. त्यासाठी आवश्यक त्या सुधारणा व उपाययोजना सातत्याने राबविण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या भेटीमुळे विद्यालयाच्या कार्यपद्धतीला प्रोत्साहन मिळाले असून विद्यार्थ्यांमध्येही नवचैतन्य निर्माण झाले आहे.
