दिवाळी सणाला ५० महिलांमध्ये चैतन्य
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
महिला सशक्तीकरण आणि स्वयंरोजगाराच्या क्षेत्रात कार्यरत पवन चॅरिटेबल ट्रस्टने दिवाळीच्या सणानिमित्त वंचित घटक व अनुसूचित जाती-जातीतल्या ५० महिलांना स्वयंरोजगारासाठी शिलाई मशीन व हँड एम्ब्रॉयडरी मशीनसह संपूर्ण किटचे वाटप केले. किटमध्ये कात्री, कापड, पावडर, विविध आकारांच्या २५ सुई असे १४ उपयुक्त साहित्य समाविष्ट होते.
कार्यक्रमात दिल्ली येथील हॅंडीक्राफ्ट विभागाचे असिस्टंट कमिशनर अमन जैन यांनी महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी उपक्रमाचे कौतुक केले. पवन ट्रस्ट वंचित घटकांसाठी हस्तकला, स्वयंरोजगार तसेच स्वावलंबनाचे धडे देत आहे. यावेळी शिलाई प्रशिक्षणाचे आयोजनही केले होते. महिलांना घरबसल्या शिवणकामाचा व्यवसाय सुरू करता यावा, म्हणून मोफत शिलाई मशीन देण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागातील महिलांसाठी रोजगाराचा मोठा आधार ठरेल, असे पवन ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. विलास नारखेडे यांनी सांगितले.
कीट मिळाल्यामुळे महिलांनी आर्थिक स्वावलंबनाचा आनंद अनुभवला. महिलांना दिलेले कीट त्यांच्या दिवाळीला आनंदाला चैतन्य देणार आहे, असे कारागीर उषाबाई सुरवाडे यांनी सांगितले. हे कीट केवळ भौतिक वस्तूंचा संच नाही तर शासन व संस्था यांच्या काळजीचे प्रतीक असल्याचे दीपाली सोनवणे म्हणाल्या. जेव्हा एक महिला मशीनच्या माध्यमातून घर चालवेल, तेव्हा दिवाळीत ही मशीन सर्वांना प्रकाशित करेल. परिवारातील आर्थिक ताण कमी होईल. तसेच सण अधिक आनंदाने साजरा होईल, असे प्रीती बिऱ्हाडे यांनी सांगितले.
दिवाळी सणाचा आनंद घेण्यासाठी महिलांना मिळाली प्रेरणा
उपक्रमामुळे महिलांनी कृतज्ञता व्यक्त केली. समाजात सकारात्मक व उत्साही वातावरण निर्माण झाले. त्यामुळे महिलांना दिवाळी सणाचा आनंद घेण्यासाठी प्रेरणा मिळाली. कार्यक्रमात शैलेंद्र कुमार सिंग, प्रमोद कुमार आदी मान्यवर उपस्थित होते. यशस्वीतेसाठी पवन नारखेडे, संतोष पाटील, महेंद्र पाटील, प्रतिभा खडके, सीमा चौधरी, जगदीश कुमार, दुर्गादास कोल्हे, विशाल कुमार यांनी परिश्रम घेतले.