ज्ञानगंगा, एकलव्य प्राथमिक विद्यामंदिरात आरोग्य विभागाकडून प्रारंभ
साईमत/जामनेर/प्रतिनिधी
जळगाव जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्यावतीने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर व जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ.रमेश धापते यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात एक लाख ४७ हजार ५९ मुला- मुलींना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले. त्यात शहरी भागातील ३७ हजार १८१ व ग्रामीण भागातील एक लाख ९ हजार ८७८ मुला-मुलींचा समावेश आहे.
जंतामुळे मुला-मुलींमध्ये रक्तक्षय,कुपोषण,सतत थकवा, शारीरिक व मानसिक वाढ न होणे, पोटदुखी, डोकेदुखी आदी समस्या जाणवत असतात.त्यावर उपाययोजना म्हणून आरोग्य विभागामार्फत अंगणवाडी विभाग व शिक्षण विभाग यांच्या सहकार्याने तसेच शाळा बाह्य मुला-मुलींना आशा स्वयंसेविका मार्फत वय वर्ष २ ते १९ वर्षापर्यंत मुला-मुलींना जंतनाशक गोळ्या देवून राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा करण्यात येतो. राष्ट्रीय जंतनाशक दिनाचा तालुकास्तरीय प्रारंभ ज्ञानगंगा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच एकलव्य प्राथमिक विद्यामंदिर, जामनेर येथे करण्यात आला. अध्यक्षस्थानी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.चंद्रमणी सुरवाडे, डॉ.जितेंद्र वानखेडे होते.
वैयक्तिक स्वच्छतेबाबत केले मार्गदर्शन
यावेळी स्नेहल पाटील, योगेश बाविस्कर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. याप्रसंगी आरोग्य विभागाच्यावतीने डॉ.निलेश पाटील, डॉ. धनंजय पाटील, डॉ.स्वाती विसपुते, डॉ.अनिता राठोड, डॉ.कविता काळे, डॉ.हर्षाली गोसावी, डॉ.पंकज पाटील यांच्यासह टीमद्वारे आरोग्य तपासणी करून वैयक्तिक स्वच्छतेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्राचार्य राजेंद्र सोनवणे, सूत्रसंचालन व्ही.एन. पाटील यांनी तर मुख्याध्यापक देविदास काळे यांनी आभार मानले.