मंडळातर्फे राबविलेल्या उपक्रमाचे सर्वत्र होतेय कौतुक
साईमत/मलकापूर/प्रतिनिधी :
गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने शहरातील पार्वती सुतभक्त गणेश मंडळातर्फे आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू शालेय विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप करण्याचा अनोखा उपक्रम राबवून १२ विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप करण्यात आले. सोबतच मंडळाचे १२५ वर्ष पूर्ण झाल्याने वर्षभरात १२५ सायकलींचे वाटप करण्याचा मानस मंडळातर्फे केला. मंडळातर्फे राबविलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
समाजाचे एकत्रीकरण तथा स्वातंत्र्याच्या लढ्यात उपयोग होण्याच्या उद्देशातून लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिकरित्या गणेशोत्सव साजरा करण्याची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या संकल्पनेला प्रेरित होऊन मलकापूर शहरातील विद्वान धार्मिक लोकांचा परिसर म्हणून ओळखल्या जाणारा दुर्गा नगर परिसरातील त्या काळातील नागरिकांनी पुढाकार घेत पार्वती सुतभक्त गणेश मंडळाची स्थापना केली. समाजाला उपयोगी अशा उपक्रमांची त्या काळापासूनच सुरुवात झाली. आपल्या पूर्वजांचा वसा, वारसा गत १२५ वर्षापासून जपत पार्वतीसुत भक्त गणेश मंडळाची निरंतर स्थापना करण्यात येऊन गणेशोत्सव मोठ्या उल्हासात साजरा करण्यात येतो. त्यामध्ये यावर्षी सामाजिक दायित्व जोपासण्याच्या उद्देशातून यावर्षी मंडळाच्या कार्यकारिणीमार्फत मलकापूर परिसरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल तथा गरजू विद्यार्थ्यांना मंडळातर्फे सायकल वाटप करण्याची संकल्पना सुरू केली.
सायकल वाटपप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नगर संघ चालक दामोदर लखानी, नगर सह संघ चालक राजेश महाजन, माजी नगराध्यक्ष नारायणदास निहालानी, ज्येष्ठ पत्रकार वीरसिंह राजपूत, माजी नगरसेवक सुहास चवरे, उद्योजक मनीष लखानी, मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे अंमलदार दीपक नाफडे यांची उपस्थिती लाभली. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते महाआरती करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. गणरायाच्या जयघोषातून गरजू विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप करण्यात आले.
१२ विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप
सायकलच्या वाटपात गोविंद विष्णू महाजन विद्यालयाचा सोहम गजानन चिमकर, भाग्यश्री अमोल कुयटे, हिराबाई कन्या विद्यालयाची मीरा किशोर पाटील, खुशी मुकेश पांडे, म्युन्सिपल हायस्कुलमधून आदित्य रामेश्वर कांडेलकर, शिवम योगेश कासे, चांडक विद्यालयामधून श्रुती डाबेराव, अपेक्षा अजय तायडे, सार्थक संजय तळेकर, नूतन विद्यालयामधून अपेक्षा अजय तायडे, आयुषी अरुण भोंडेकर, आदित्य गोपाल श्रीवास्तव अशा १२ विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप करण्यात आले.
१२५ सायकलींचे वाटप करण्याचा मानस
समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात नेहमीच अग्रेसर राहण्याची भूमिका घेत असतो. पूर्वजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून यापुढेही समाजासाठी कार्य करण्याचा प्रयत्न राहील. मंडळाचे १२५ वर्ष पूर्ण झाल्याने १२५ सायकलींचे गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्याचा मानस असणार आहे.
-अमोल निंबोळे, अध्यक्ष, पार्वती सुतभक्त गणेश मंडळ