मेळाव्याला आदिवासी मंत्री उईके यांची लाभली उपस्थिती
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात ‘जनजातीय गौरव वर्ष’ निमित्त ‘प्रधानमंत्री धरती आबा जनभागीदारी अभियान’ अंतर्गत भव्य लाभ वाटप आणि लाभार्थी संवाद मेळावा शुक्रवारी, ८ ऑगस्ट रोजी आयोजित केला होता. हा मेळावा आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. याप्रसंगी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, मंत्री संजय सावकारे, आ.राजूमामा भोळे, आ.चंद्रकांत सोनवणे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आदिवासी बांधवांना वनपट्ट्यांचे वाटप करण्यात आले. ज्यामुळे त्यांना त्यांच्या जमिनीवरील हक्क प्राप्त झाला. तसेच विविध शैक्षणिक वर्षांत उत्कृष्ट गुण संपादन करणाऱ्या आदिवासी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांना प्रमाणपत्र आणि गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. ज्यामुळे त्यांच्या पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळेल.
कार्यक्रमाचे उद्घाटन आदिवासी मंत्री उईके यांच्या हस्ते भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीप प्रज्ज्वलन आणि पारंपरिक तीर-कमान हातात घेऊन अनोख्या पद्धतीने करण्यात आले. यावेळी भटक्या पारधी समाजासाठी लवकरच एक विशेष पॅकेज आदिवासी विभागामार्फत तयार करण्यात येणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा मंत्र्यांनी केली.
याप्रसंगी मंत्री संजय सावकारे यांनी महाराष्ट्राला लागून असलेल्या मध्यप्रदेशातून काही आदिवासी बांधव महाराष्ट्रात अतिक्रमण करत असल्याने येथील आदिवासींवर अन्याय होत असल्याचा मुद्दा मांडला. याबाबत लक्ष घालण्याची विनंती मंत्र्यांना केली.
खा.रक्षाताई खडसे यांनी केंद्राच्या विविध योजना आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपला सतत पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शासनाच्या सर्व योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील असल्याचे आणि सर्व विभागांना याबाबत सूचना दिल्या असल्याचे नमूद केले.
रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन
कार्यक्रमापूर्वी, अशोक उईके यांच्या हस्ते रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी भाकरी आणि ठेचा अशा पारंपरिक आदिवासी जेवणाचा आस्वाद घेतला. त्यानंतर त्यांनी सर्व विभागांच्या महत्वपूर्ण अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन विविध सूचना केल्या. ज्यामुळे आदिवासी समाजाच्या विकासासाठी अधिक प्रभावीपणे काम करता येईल, असे सांगितले.