साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी
संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनांअंतर्गत समाजातील अंध, अपंग, विधवा, परित्यक्त्या, निराधार व्यक्तींना चरितार्थ चालविण्यासाठी आधार म्हणून शासनातर्फे दरमहा मानधन (वेतन) दिले जाते. परंतु गेल्या पाच महिन्यांपासून योजनांच्या लाभार्थ्यांना मानधन मिळाले नसल्याने त्यांच्यासमोर चरितार्थ कसा चालवावा? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
ही कैफियत लाभार्थ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्याकडे मांडली. त्यावर त्यांनी पक्षाचे पदाधिकारी आणि योजनांच्या लाभार्थ्यांना सोबत घेऊन मुक्ताईनगर तहसील कार्यालय गाठून याबाबत प्रशासनाला जाब विचारला. लवकरात लवकर लाभार्थ्यांना मानधन वितरित करावे, अन्यथा आगामी काळात पक्षातर्फे आंदोलनाचा इशारा दिला आहे. यावर नायब तहसीलदार माकोडे यांनी आठवडाभरात योजनांच्या लाभार्थ्यांच्या खात्यात त्यांचे मानधन जमा करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
यावेळी माजी सभापती निवृत्ती पाटील, शहराध्यक्ष राजेंद्र माळी, युवक शहराध्यक्ष बबलू सापधरे, प्रदीप साळुंखे, बापू ससाणे, बाळा भालशंकर, विकास पाटील, रउफ खान, सुनील काटे, संजय कपले, संदीप जावळे, संजय कोळी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.