Nageshwar Temple : नागेश्वर मंदिर संस्थेच्या जागेचा वाद चव्हाट्यावर

0
107

चंद्रकांत बढे मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल, एकास अटक

साईमत/वरणगाव/प्रतिनिधी

वरणगाव ते बोदवड मार्गावरील श्री नागेश्वर महादेव मंदिर संस्थेची जागा अध्यक्ष चंद्रकांत बढे यांनी एका फायर इन्स्टिट्यूट संस्थेला भाडेतत्त्वावर दिली आहे. मात्र, जागेचा भाडे तत्त्वाचा वाद सुरू असतांनाच भाडेकरूने बळजबरीने कंपाऊड करण्यास सुरुवात केली होती. याबाबत त्यांनी मज्जाव केल्यावर वाद विकोपाला जावून भाडेकरूचे पती दीपक वानखेडे आणि त्यांचा सहकारी जितेंद्र माळी यांनी बढे यांना धक्काबुक्की करत मारहाण केली होती. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच एकास अटक केल्यानंतर न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

सविस्तर असे की, वरणगाव ते बोदवड मार्गावरील पुरातन श्री नागेश्वर महादेव मंदिर संस्था आहे. संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत हरी बढे यांनी संस्थेच्या इमारतीमधील काही जागा ‘इंडीयन इन्स्टिट्युट ऑफ फायर ॲन्ड सेफ्टी इंजिनिअरिंग संस्थेच्या अध्यक्षा सविता वानखेडे यांना भाडे तत्त्वावर दिली आहे. मात्र, मागील काही महिन्यांपासून जागेच्या भाडे करारावरून संबंधितांमध्ये वाद सुरू असतानांच फायर इन्स्टिट्युट संस्थेच्या अध्यक्षाचे पती दीपक बळीराम वानखेडे (रा. आयुध निर्माणी, वरणगाव) आणि त्यांचा सहकारी जितेंद्र गणेश माळी यांनी जागेला संरक्षण जाळी कुंपन करण्यास सुरुवात केली असल्याची माहिती चंद्रकांत बढे यांना मिळाली. त्यानुसार ते संस्थेचे सदस्य गोविंदा नामदेव माळी यांनी त्या ठिकाणी जावून काम करण्यास मज्जाव केला. यावेळी वादावादी निर्माण होवून दीपक वानखेडे, त्यांचा सहकारी जितेंद्र माळी यांनी वय वर्ष ८० असलेल्या बढे व त्यांचे सहकारी सदस्य यांना धक्काबुक्की करत मारहाण केली. यावेळी बढे यांच्या बोटातील दहा ग्रॅम सोन्याची अंगठी गहाळ झाली आहे. याप्रकरणी चंद्रकांत बढे यांनी वरणगाव पोलीस ठाण्यात दोन महिन्यानंतर दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दोघांपैकी दीपक वानखेडे यास अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

जातीय वादाचा गुन्हा दाखल

नेहमी सर्व जाती-धर्माच्या नागरिकांच्या सुख-दु:खात सहभागी होऊन त्यांना दिलासा देणारे चंद्रकांत हरी बढे यांच्याशी श्री नागेश्वर महादेव मंदिर संस्थेच्या भाडे कराराच्या जागेमुळे वाद निर्माण झाला आहे. याप्रकरणी २८ फेब्रुवारी रोजी बढे यांना भाडेकरू महिलेच्या पतीने व त्यांच्या सहकाऱ्यांनी मारहाण केली होती. याप्रकरणी त्यावेळी काही लोकांच्या मध्यस्थीनंतर तसेच मुक्का मार लागल्याने त्यांच्यावर खासगी उपचार सुरू होते. त्यामुळे गुन्हा दाखल करण्याचे टाळले होते. मात्र, त्यानंतर आयुध निर्माणीत कार्यरत भाडेकरूचे पती दीपक वानखेडे यांनी ९ मे रोजी पोलीस ठाण्यात बढे आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरुध्द जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

जातीयवादाचा खोटा गुन्हा मागे घेण्याची मागणी

याप्रकरणी खळबळ उडाल्याने संविधान आर्मीचे संस्थापक-अध्यक्ष जगन सोनवणे, इतर सामाजिक संघटनांनी पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी तसेच गृह विभागाकडे निवेदनाद्वारे बढे यांच्यावर दाखल केलेला जातीयवादाचा खोटा गुन्हा मागे घेण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here