साईमत / मुंबई
मुंबईतील मुलुंड रेल्वे स्थानकावर घडलेल्या एका धक्कादायक घटनेने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन शाळकरी मुलांमधील वाद इतका चिघळला की त्यांनी थेट रेल्वे रुळांवर उतरून एकमेकांशी मारामारी सुरू केली.
मिळालेल्या माहितीनुसार, एका मुलीवरून सुरू झालेला हा वाद प्लॅटफॉर्मवरून रुळांपर्यंत पोहोचला. वादाच्या भरात एक मुलगा तोल जाऊन रुळांवर पडला, मात्र त्यानंतरही दोघांनी भांडण थांबवले नाही. उलट, त्यांनी एकमेकांवर हल्ला करत गळा आवळण्याचाही प्रयत्न केला.
ही सर्व घटना प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर घडली असून, त्याच वेळी समोरून लोकल ट्रेन येत होती. प्रवासी “ट्रेन येत आहे” असे ओरडून सावध करत होते, पण मुलांनी त्याकडे दुर्लक्ष केले.
शेवटी, काही धाडसी प्रवाशांनी रुळांवर उतरून दोघांना वेगळं केलं आणि त्यांना सुरक्षितपणे प्लॅटफॉर्मवर आणलं. काही क्षणांतच ट्रेन तिथे दाखल झाली. त्यामुळे प्रवाशांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला.
घटनास्थळी त्या वेळी पोलिस किंवा आरपीएफ कर्मचारी नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, प्लॅटफॉर्मवर आल्यानंतरही मुलांनी पुन्हा भांडण सुरू केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, रेल्वे प्रशासनाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
