साईमत, मलकापूर : प्रतिनिधी
निराधार, बेसहारा, विधवा, दिव्यांग, वयोवृध्द यांच्यासह आदींना विविध योजनांच्या माध्यमातून गरजुंना शासनाच्यावतीने अनुदान देण्यात येते. त्याअनुषंगाने मलकापूर तहसील कार्यालयात बहुसंख्य प्रकरणे प्रलंबित होती. याबाबत अपंग जनता दल संघटनेचे राज्य सचिव कलीम शेख यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. त्यामुळे सुमारे ४०० प्रकरणे निकाली काढण्यात आले असल्याची माहिती कलीम शेख यांनी दिली. त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे.
याबाबत वेळोवेळी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्यासह आदींकडे पाठपुरावा केला होता. परंतु संजय गांधी निराधार विभागात काही वर्षापासून ठाण मांडून बसलेल्या एका अधिकाऱ्याने गरजू निराधारांना त्रास देण्याच्या उद्देशाने की काय, त्यांच्या प्रकरणांचा निपटाराच केला नाही. त्यामुळे सर्व प्रकरणी ३० जानेवारी २०२४ रोजी बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना सर्व प्रकाराची माहिती निवेदनाद्वारे दिली.होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर मलकापूर प्रशासकीय स्तरावर व प्रलंबित असलेल्या केसेसचा निपटारा करण्यासाठी हालचालींना वेग आला होता. २०२२-२३ च्या प्रलंबित ४०० केसेसचा निपटारा तातडीने गेल्या १ फेब्रुवारी रोजी करण्यात आला.
२०२४ मध्ये अनेकांनी आपल्या परिपूर्ण प्रस्तावासह महसूल प्रशासनाकडे शासनाच्या विविध योजनांच्या लाभासाठी प्रस्ताव दाखल केले होते. त्या प्रस्तावाबाबत प्रशासकीय स्तरावर बैठक होत नसल्याने ते प्रस्तावही प्रलंबित पडलेले होते. त्यावर अपंग जनता दल संघटनेच्यावतीने राज्य सचिव कलीम शेख यांनी उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदार यांची भेट घेऊन याप्रकरणी लक्ष घालण्याबाबत १५ मार्चला निवेदन दिले होते.
४०० लाभार्थ्यांना मिळाला दिलासा
निवेदनात लोकसभा निवडणूक लक्षात घेता लागणारी आचार संहिता लागण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने आजपर्यंत संजय गांधी योजनेअंतर्गत प्रलंबित १००० ते १५०० प्रकरणे संकेतस्थळावर तपासून गरजूंना न्याय देण्यात यावा, त्यानंतर नव्यानेच रूजू झालेले उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे आणि तहसीलदार राहुल तायडे यांनी प्रशासकीय स्तरावर २०२४ च्या असलेल्या गरजू लाभार्थ्यांच्या परिपूर्ण केसेसचा निपटारा आचारसंहिता लागण्यापूर्वी करीत शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ गरजुंना ७ मार्चला उपलब्ध करून दिला आहे. २०२४ ह्या वर्षात ४०० लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. उर्वरित काही प्रकरणे असल्यास संजय गांधी विभागाचे नायब तहसीलदार श्रीकृष्ण उगले लवकरच निकाली काढणार असल्याचे सांगितले.