साईमत, पाचोरा : प्रतिनिधी
शहरात साथीच्या रोगांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पाचोरा नगरपरिषदेने दोन दिवसांपासून जंतूनाशके, औषध फवारणी मोहिमेला गती दिली आहे. गल्लीबोळ आणि अडगळीतील जागांवर डास प्रतिबंधक फवारणी करण्यात येत आहे. यासह नागरिकांनी साथीच्या आजाराबाबत खबरदारी घेण्याचे आवाहन पालिकेच्या मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी केले आहे.
पाचोरा नगर पालिकेच्या मुख्याधिकारी बाविस्कर यांनी नागरिकांच्या मागण्यांची दखल घेत संपूर्ण शहरभर डास प्रतिबंधक फवारणीची मोहीम आखणी केलेली आहे. त्याची अंमलबजावणी टप्प्या टप्प्याने करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे नागरिकांना पाणी साठवणीचे साहित्य आठवड्यातून एकदा स्वच्छ करावे, त्यावर नियमित झाकण ठेवावे, गळके नळ वेळीच दुरुस्त करणे, घराभोवती कचरा साठवू नये, पावसाचे व सांडपाणी साचणार नाही, याची दक्षता घेणे, डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी डबकी, रिकामे टायर्स, डबे, बॅरेल, नारळ करवंटी, वॉटर कुलर, फ्रीज आदी साहित्याची आठवड्यातून एकदा स्वच्छता करावी, आठवड्यातील एक दिवस कोरडा दिन पाळावा, असे आवाहन मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी केले आहे.