साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
येथील विजय नाना पाटील आर्मी स्कूल आणि जुनियर कॉलेजमध्ये ९ वी ते १२ वीच्या दुसऱ्या टप्प्यातील पालक शिक्षक सहविचार सभा आणि एनडीएविषयी चर्चासत्र नुकतेच घेण्यात आले. सभेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य पी.एम.कोळी होते. प्रमुख पाहुणे म्हणून पालक प्रतिनिधी संजय चौधरी, आसाराम पवार, जयवंत बोरसे, सुनिता चौधरी, प्रदीप पाटील तसेच प्रभारी कमांडर सुभेदार मेजर नागराज पाटील, सुभेदार मेजर श्रीराम पाटील, नायक सुभेदार भटू पाटील, ज्येष्ठ शिक्षक व्ही. जी. बोरसे उपस्थित होते.
यावेळी सुभेदार मेजर नागराज पाटील यांनी प्रास्ताविक करुन एनडीए संदर्भात मार्गदर्शन केले. त्यानंतर सैनिकी प्रशिक्षणासंदर्भात सुभेदार मेजर श्रीराम पाटील यांनी मार्गदर्शन केले. गणित शिक्षक अनिल वानखेडे यांनी विषयासंदर्भात मार्गदर्शन केले तर इंग्रजीच्या संदर्भात सुनील नगराळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पालकांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य पी.एम.कोळी यांनी पालकांच्या प्रश्नांना उत्तरे देऊन त्यांच्या समाधान केले. सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक अनिल पाटील तर बी.डी.पाटील यांनी आभार मानले.